आमदार नीतेश राणे यांची टीका ः 24 रोजी रत्नागिरीत अमित शहा यांची जाहीर सभा..
⚡कणकवली ता.१६-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार येत्या एक-दोन दिवसांत जाहीर होईल. या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. विनायक राऊत हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. मागील १० वर्षांत त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच काम केले नाही. राऊत हे निष्क्रीय खासदार ठरले आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनता त्यांचा पराभव करून हे पार्सल मुंबईत पाठवतील, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली. यावेळी राणेंनी भाजपच्या संकल्पपत्राचे वाचन केले.
तसेच महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजप नेते तथा गृहमंत्री अमित शहा यांची २४ एप्रिलला रत्नागिरी येथे जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती राणेंनी दिली.
प्रहार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. राणे बोलत होते.यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, देवगडचे तालुकाध्यक्ष मिलिंद साटम उपस्थित होते. राणे म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारवर १० वर्षांच्या कालखंडात एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. विरोधक मोदी सरकावर करीत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आहेत. खासदार संजय राऊत व त्यांचे कुटुंबीय खिचडी घोटळ्यात कोट्यवधी पैसे खाल्ले आहेत. या घोटळ्याची ईडी चौकशी सुरु आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत हे जेलवारी कुरून आले आहेत. त्यामुळे भ्रष्टाराच्या मुद्यावरून मोदींना टार्गेट करून स्वतःचे हसे करून घेऊ नये, असा टोला राणेंनी राऊतांना लगावला.
राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत, शिवसेनेतून बाहेर पडलेल्या ४०आमदारांमुळे ते राज्यसभेचे खासदार होऊ शकले. राज्यसभेची मुदत संपल्यानंतर राऊत आपण पुन्हा खासदार होणार याची चिंता करावी. दररोज सकाळी राऊतपत्रकारांशी संवाद साधतात. मात्र, त्यांची स्क्रीप्ट ही सिल्व्हर ओक वरून येते, असाटोला राणेंनी लगावला. २०१४, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जनतेला दिलेल्या संकल्पपत्रातील प्रत्येक आश्वासन पूर्ण केले आहेत. मोदींच्या नेतृत्वामुळे चीन,पाकिस्तान भारताकडे वाकड्या नजरने पाहत नाही. काँग्रेसच्या राजवटीत आपला देश सर्वबाबतीमध्ये सुरक्षित नव्हता. मात्र, मोदींच्या नेतृत्वामुळे मागील १० वर्षातभारत देश सर्वबाबतींमध्ये सुरक्षित झाला, असा दावा राणेंनी केला. सबका साथ सबका विकास हे भाजपचा अजेंडा असून त्यानुसार भाजप काम करीत आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ २४ एप्रिलला गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे. ही सभा भव्य दिव्य होण्यासाठी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या मतदारसंघातून मोदींच्या विचारांचा उमेदवार विक्रमी मताधिक्यांनी निवडून येण्यासाठीआतापर्यंत ७० टक्के प्रचाराचे काम पूर्ण झाल्याचे राणेंनी सांगितले. काँग्रेसच्या राजवटीवर राणेंनी जोरदार प्रहार केला. यावेळी त्यांनी भाजपच्या संकल्पपत्राचे वाचून करतानाच २०२४ संकल्पपत्रात भाजपने जनतेला कोणती ठळक आश्वासाने दिली आहेत, ती त्यांनी वाचून दाखविली.
