कणकवली ः मुंबई-गोवा महामार्गावरून रस्ता क्राॅस करीत असताना अज्ञात वाहनाने पाचदारी माय-लेकाला धडक दिली. शरदचंद्र रामचंद्र जाधव (47) व मंगला रामचंद्र जाधव (70, दोघे रा. जानवली-बौद्धवाडी) अशी अपघातग्रस्तांची नावे आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर वाहन चालकाने धूम ठोकली. दरम्यान, शरदचंद्र याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मंगला जाधव या देवगड येथील आपल्या नातेवाईकांकडे गेल्या होत्या. त्यानंतर त्या एसटीने कणकवलीकडे येण्यास निघल्या. जानवली येथील बस स्टाॅपवर उतरल्या. त्यावेळी त्यांनी आपला मुलगा शरदचंद्र या ठिकाणी बोलावून घेतले. रस्त्या क्राॅस करीत असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दोघे गंभीररित्या जखमी झाले. अपघातग्रस्तांना ग्रामस्थांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, याठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यात उपचारदम्यान शरदचंद्र याचा मृत्यू झाला. अपघातानंतर धूम ठोकलेल्या चालकासह कार फोंड्यात पडकल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
