कोणाचे पार्सल बांधायचे हे भाजपने ठरविले आहे:भाजपच्या केनवडेकर यांचा उबाठा सेनेच्या खोबरेकर यांना प्रत्युत्तर.
मालवण (प्रतिनिधी)
नारायण राणे यांच्यावर टीका करणाऱ्या ठाकरे शिवसेनेच्या हरी खोबरेकर यांनी प्रथम खास. विनायक राऊत यांनी कोणता विकास केला हे सांगावे. राणे यांचे पार्सल बांधण्याची वल्गना करणाऱ्या खोबरेकर यांनी राणे यांचे पार्सल बांधण्याची ताकद कोणाचीही नाही हे लक्षात ठेवावे. ज्यांची कोणाची पार्सल बांधायची आहेत ती बांधण्यास भाजप कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजपचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत करतानाच राणे व भाजपची काळजी ठाकरे शिवसेनेने करू नये, ते सांभाळण्यास भाजप कार्यकर्ते सक्षम आहेत ठाकरे शिवसेनेने दहशतवादाच्या गोष्टी करण्यापेक्षा आमच्याशी विकासावर चर्चा करून दाखवावी, असे आव्हानही त्यांनी दिले.
मालवण येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विजय केनवाडेकर हे बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, पंकज सादये, महेश सारंग, संदीप परब, आबा हडकर, ललित चव्हाण, पंकज पेडणेकर, नारायण धुरी, नंदू देसाई आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी विजय केनवडेकर म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली अबकी बार चारसौ पार हीच भूमिका घेऊन लढणार आहोत. विकासाचा अजेंडा घेऊनच आमचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम सुरु आहे. याच अनुषंगाने मालवण येथे नारायण राणे यांची झालेली बैठक ही निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारी बैठक होती. या बैठकीत केवळ राणे समर्थक उपस्थित होते हा आरोप खोटा असून भाजपचे जुने व नवे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही सर्व कार्यकर्ते भाजपच्या झेंड्याखाली काम करत आहोत, त्यामुळे जुना आणि नवा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक करत असतील तर तो यशस्वी होणार नाही, असेही केनवडेकर म्हणाले.
२०१४ व २०१९ सालच्या निवडणुकीत भाजपने तत्कालीन शिवसेनेसोबत खांद्याला खांदा लावून काम केले. मात्र त्या वेळेच्या मदतीची जाणीव ठाकरे शिवसेनेला नाही. आमच्या मदतीने निवडून आलेले खासदार विनायक राऊत यांनी भाजपला कधी विश्वासात घेतले नाही. शिवसेनेच्या यशाला यशाची झालर ही भाजपमुळेच होती. २०१४ मध्ये विनायक जेव्हा खासदार झाले तेव्हा सुरेश प्रभू हे भाजपमधून राज्यसभेवर गेले ते रेल्वेमंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री झाले. कोकण रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, चिपी विमानतळ यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. २०१९ मध्ये विनायक राऊत हे पुन्हा खासदार झाल्यावर नारायण राणे हे भाजपमधून राज्यसभेवर गेले व सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्री बनले. त्यांनी आपल्या मंत्रालयाचा परिपूर्ण उपयोग कोकणसाठी केला. त्यांच्याच माध्यमातून जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्र उभे राहत आहे, दोडामार्ग येथे मेडिकलवर आधारित कारखाने उभारण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. एवढे कार्य असताना भाजपने जिल्ह्यासाठी काय केले हे विचारणे हास्यास्पद आहे. खास. राऊत यांनी कोणता विकास केला हे हरी खोबरेकर यांनी सांगावे. सुरेश प्रभू, नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या बिएसएनएल टॉवरचे श्रेय घेण्याचे काम राऊत यांनी केले, राऊत यांनी टॉवरचे फक्त सांगाडे उभारले, अशी टीका केनवडेकर यांनी केली. स्वदेश दर्शन मधून राऊत यांनी किती निधी जिल्ह्यासाठी आणला, मच्छिमार, वॉटरस्पोर्ट्स, सीआरझेड प्रश्न यासाठी राऊत यांनी काय योगदान दिले हे देखील खोबरेकर यांनी सांगावे, असे केनवडेकर म्हणाले.
हरी खोबरेकर यांनी दहशतवादाच्या गोष्टी करू नये, जिल्ह्यात कोणताच दहशतवाद नाही. हरी खोबरेकर यांचा शिवसेनेत प्रवेशही झाला नव्हता, त्या आधीपासून नारायण राणे हे मातोश्रीवर सन्मानाने काम करत होते. टीका जरूर करावी, पण वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न खोबरेकर यांनी करू नये. विकासावर चर्चा करू दाखवावी. मालवणात सूक्ष्म कर्ज प्रकरणात ज्यांना अडकवले गेले त्यांना सोडवा, या प्रकरणात कोणी किती कमिशन खाल्ले आहे, त्याची माहिती आमच्याकडे आहे, त्यांना आम्ही सोडणार नाही, असा खळबळजनक इशाराही केनवडेकर यांनी यावेळी दिला. आमचा नेता निवडून आणण्याची तयारी आम्ही सुरु केली आहे, विजय हा भाजपचाच होणार, असेही केनवडेकर म्हणाले.
