अभिनेते अनिल गवस यांनी केले आवाहन:भावार्थ मांद्रेकर लिखित सरनोबत हंबीरराव पुस्तकाचे प्रकाशन..
⚡बांदा ता.११-: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व त्यांचे शूर योद्धा यांचा इतिहास, त्यांची युद्धनीती, गनिमी कावे हे आताच्या पिढीला समजणे अत्यंत आवश्यक आहे. गोव्याच्या मातीतील लेखक भावार्थ मांद्रेकर यांनी लिहिलेले सरनौबत हंबीररराव हे पुस्तक खरोखरच वाचनीय आहे. आपण स्वतः ही व्यक्तीरेखा साकारलेली असल्याने मी हंबीररराव पूर्णपणे जगलो आहे. लेखक मांद्रेकर यांनी यापुढेही मर्द मराठा शृंखलेतील इतर पराक्रमी योद्ध्यांचे लेखन करून ते आताच्या पिढीसमोर आणावे असे प्रतिपादन ज्येष्ठ सिने अभिनेते अनिल गवस यांनी वाफोली येथे केले.
छोट्या पडद्यावर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मालिकेत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारणारे अभिनेते अनिल गवस यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम त्यांच्याच निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री गवस बोलत होते. यावेळी गोव्यातील नामवंत लेखक ज्यांनी खंबीर सरनौबत हंबीरराव व अद्वितीय रणसंग्राम या पुस्तकाचे लेखन केले आहे ते लेखक भावार्थ मांद्रेकर, पत्रकार निलेश मोरजकर, प्रवीण परब, उमेश गाड, यश माधव, शिक्षक हंसराज गवळे, रामचंद्र जाधव, अमोल आसोलकर, साहिल नारूळकर, तुळशीदास चारी आदी उपस्थित होते.
यावेळी अभिनेते श्री गवस यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. ते म्हणाले की, कोकण, गोव्यात गुणवत्ता ठासून भरलेली आहे. मात्र योग्य व्यासपीठ मिळत नसल्याने कलाकार मागे पडतात. झगमगत्या दुनियेत मोठी स्पर्धा असल्याने यात टिकून राहण्यासाठी नैसर्गिक अभिनयाबरोबरच वक्तृत्व शैली, संभाषण कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. यासाठी कोकणात विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवोदित बाल कलाकारांसाठी अभिनय कार्यशाळा ही गुरुकुल पद्धतीने घेण्याचा आपला मानस आहे.
अभिनय क्षेत्र हे आभासी आहे. नाटक सादर करताना नेहमीच अभिनयचा कस लागतो. लाईव्ह प्रेक्षकांसमोर कलाकाराला नेहमीच दक्ष राहावे लागते. सर्वसमावेशक भूमिका करतो तोच खरा कलावंत आहे. त्यामुळे एकाच भूमिकेत न अडकता कलाकारने नावीन्यपूर्व व आव्हानत्मक भूमिका साकारणे देखील गरजेचे आहे. कलाकार हा देखील माणूस असल्याने तो २४ तास मनोरंजन करू शकत नाही. त्यामुळे कलाकारने या आभासी जगात न जगता सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळून देखील समाजाच्या समस्या जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे. कारण प्रेक्षक हा कलाकाराचे नेहमीच अनुकरण करत असतो. नवोदित कलाकारांना या क्षेत्रात खुप संधी आहे. सिनेसृष्टीत नाव कमवायचे असेल किंवा यशस्वी व्हायचे असेल तर कलाकारने आपल्या भूमिकेच्या प्रेमात कधीच राहू नये.
यावेळी त्यांनी सरनौबत हंबीरराव पुस्तकाचे तोंडभरून कौतुक केले. लेखक श्री मांद्रेकर यांनी मर्द मराठा या शृंखलेचे लिखाण सुरु असून लवकरच इतिहास प्रेमिंच्या भेटीस पुस्तक येणार असल्याचे सांगितले. यावेळी श्री गवस यांचा श्री मांद्रेकर यांच्या हस्ते हंबीरराव मोहिते पुस्तकाची प्रत व सरनौबत हंबीरराव यांचे तैलचित्र भेट देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक निलेश मोरजकर यांनी केले. आभार भावार्थ मांद्रेकर यांनी मानले.
