तत्कालिन ग्रामविकास अधिकाऱ्यांसह अन्य दहाजणांचा सहभाग ; नारायण जाधव यांची माहीती..
⚡सावंतवाडी ता.११-: तळवडे ग्रामपंचायतीच्या १४ व १५ वित्त आयोग तसेच ग्रामनिधीमध्ये तब्बल ७२ लाख ८१ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे चौकशीतून सिद्ध झाले आहे. या अपहारात तत्कालीन ग्राम विकास अधिकारी नामदेव तांबे यांसह अन्य दहा जणांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी सावंतवाडी गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. याबाबतची माहिती तळवडे गावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष नारायण उर्फ बाळा जाधव यांनी दिली.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते शंकर सावंत व सुशांत गावडे उपस्थित होते. दरम्यान, या चौकशी अहवालात विद्यमान सरपंच, शाखा अभियंता व एका ठेकेदाराला वगळल्याचा आरोप नारायण जाधव यांनी केला असून त्यांच्यावर देखील कारवाई न झाल्यास १ मे रोजी महाराष्ट्र दिनी उपोषण सोडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तर प्रसंगी न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
