केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा सवाल:कणकवलीत भाजपचा कार्यकर्ता संवाद मेळावा…
⚡कणकवली ता.११-: उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी कोकणासह सिंधुदुर्गाच्या विकासासाठी काय केले? असा सवाल केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार विनायक राऊत हे भाजपमुळेचे खासदार होऊ शकले. मात्र, मागील 10 वर्षांत त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच काम केले नाही, अशी टीका राणेंनी केली.
लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्यांनी विजयी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. .
शहर भाजपतर्फे येथील मातोश्री मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी श्री. राणे बोलत होते. यावेळी आमदार नीतेश राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेविका राजश्री धुमाळे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अनुसूचित जाती-जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक किशोर राणे आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली आहे. ही शिवसेना मराठी माणसांच्या हितासाठी काहीच करू शकणार नाही. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदूत्वाची विचारसरणी सोडली अाहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका व आरोप करणे हा उद्धव ठाकरेंचा एकलमी कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कोरोनाच्या काळात औषधांच्या खरेदीत पैसे खाल्ले आहेत, असा आरोप राणेंनी केला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे विनायक राऊत खासदार आहेत. या दोन्ही जिल्ह्याच्या विकासासाठी काहीच काम केले नाही. 57 टक्के आपला खासदार निधी त्यांनी खर्च केला आहे. खासदार निधी खर्च करण्यासाठी ते टक्केवारी मागतात, असा आरोप राणेंनी करताना रेडी येथील पोर्ट चालवणार्याकडून राऊतांचे पुत्र हे दर महिन्याला जाऊन पैसे मागतात, असा गौप्यस्फोट राणेंनी केला. महाविकास आघाडीचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे मातोश्रीचे मुख्यमंत्री होते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते, अशी टीका राणेंनी केली.
कणकवलीकरांनी मला आजपर्यंत खूप दिले आहे. त्यामुळे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, केंद्रीयमंत्री अशी पदे भूषवली आहेत. भारत देश विकसित करण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातच आहेत. त्यामुळे त्यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सिंधुदुर्गातील मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला मतदार करावे. कणकवली शहरातून महायुतीच्या उमेदवाराला 9000 मते मिळावी, याकरिता कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार नीतेश राणे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना कणकवली शहराच्या विकासासाठी निधी मिळत नव्हता. या सरकारने विकासाबाबत राजकारण केले. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर शहराच्या विकासासाठी कोट्यवधी निधी प्राप्त झाला. शहराचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता भाजप पक्षात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सेवा रस्तावर असलेला शिवरायांचा पुतळा स्थलांतरित करण्यासाठी विरोधकांनी घाणेरेडे राजकारण केले. मात्र, महायुतीचे सरकार आल्यानंतर एका रात्रीत शिवरायांचा पुतळा योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला, असे राणे यांनी सांगितले. खासदार विनायक राऊतांनी मागील 10 वर्षांत रत्नागिरी व सिंधुदुर्गाच्या विकासासाठी काहीच केले नाही. कोकणात येणार्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याचे काम राऊतांनी केले आहेत. त्यामुळे प्रकल्पांना विरोध करणार्या राऊतांचा पराभव करून त्यांना घरी पाठवा. कणकवली शहरातून व तालुक्यातून महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्य मिळण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम करावे, असे आवाहन राणेंनी केले. राजश्री धुमाळे यांनी मनोगत व्यक्त केली. शहर भाजपतर्फे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे स्वागत समीर नलावडे यांनी केले. सूत्रसंचालन किशोर राणे यांनी केले. मेळावा पार पडल्यानंतर राणे साहेब तुम्ह आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली. मेळाव्याला मोठ्य़ा संख्येने भाजचे कार्यकर्ते उपस्थित होते.
