४०० पार”चा नारा सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करणार…

नारायण राणें: रत्नागिरी-सिंधुदुर्ग चा खासदार हा महायुतीचाच असणार..

⚡कुडाळ ता.०३-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “अब की बार ४०० पार” अशी जी घोषणा केली आहे ती आता आपण सत्यात उतरविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असा विश्वास भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री नारायण राणे यांनी आज कुडाळ येथे भाजप सिंधुदुर्ग संघटनात्मक आढावा बैठकीत व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे नेते निलेश राणे, भाजप आमदार नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, तालुकाप्रमुख संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, श्रीपाद तवटे, रुपेश कानडे, राकेश कांदे आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, माझे कार्यकर्ते हे ए आणि बीप्रमाणे हवेत. माझ्याकडे सी हा प्रकारच नाही. मतभेद हे विरोधकांनी करावेत, मीही करेन. पण आपापसातील भांडण ही विकासाच्या दृष्टीने आड येत असतात. मागील १० वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येथील विद्यमान खासदारांनी कोणती महत्त्वाचा विकासात्मक कामे केली ही जनतेसमोर ठेवणे महत्त्वाचे आहे. आज महायुतीचा उमेदवार येथून खासदारकीसाठी निवडून येईल. त्यामुळे केंद्रात पंतप्रधान मोदींना प्रबळ शक्ती प्राप्त होईल, असेही केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.

विनायक राऊत यांनी यापूर्वी चिपी एअरपोर्ट असेल सी वर्ल्ड प्रकल्प, रिफायनरी या कोकणात येणाऱ्या प्रकल्पांना विरोधी केला. आज चिपी विमानतळावरून विमाने उड्डाण होत आहेत. परंतु, विनायक राऊत यांनी जमीन हस्तांतरण वेळी सुद्धा विरोध दर्शविला होता. पण ज्यावेळी चिपी विमानतळाचे उद्घाटन झाले त्याचवेळी विनायक राऊत हे पुढे पुढे करत होते असा टोला आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला.
परंतु, राज्यातील मंत्री किंवा आता केंद्रीय मंत्री असताना सुद्धा मी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नेहमीच झुकते माप दिले. जिल्ह्यात अनेक उद्योग उभारण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून निधी घेतला. आज एमएसएमई या खात्याच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक उन्नती होत आहे. त्यासाठी त्यामुळे येणाऱ्या काळातही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी येथून भाजपचाच उमेदवार असावा यासाठी आम्ही आग्रही आहोत असा पुनरुच्चार यावेळी केंद्रीय मंत्री यांनी केला.

खासदारकी उमेदवारीवर आमचा दावा कायम : उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी कुडाळ येथे संध्याकाळी महायुतीची बैठक संपन्न होणार होती. या बैठकीला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे उपस्थित राहणार होते. परंतु, अचानक मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आल्यामुळे ते सिंधुदुर्ग दौरा सोडून मुंबईकडे रवाना झाले. याबाबत पत्रकारांनी उदय सामंत यांना विचारले असता ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय बैठक होणार होती, पण मुंबईत माझी अत्यंत महत्वाची बैठक आहे. मी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली. तसेच नारायण राणे यांची सुद्धा भेट घेतली. महायुतीकडून जो उमेदवार खासदारकीसाठी घोषित होईल, तो नक्की विजयी होईल, असा विश्वास शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
मागच्या वेळी ही जागा शिवसेनेकडे होती. त्यामुळे आमचा या जागेवर अजूनही दावा आहे. परंतु, बुधवारची बैठक दावे प्रतिदावे याची नाही. तर ही निवडणूक पंतप्रधान मोदींची आहे, असे ते म्हणाले.
रत्नागिरी सिंधुदुर्ग खासदारकी उमेदवारीसाठी इच्छुक असलेले किरण उर्फ भैय्या सामंत यांनी काल रात्री उशिरा आपले स्टेटस बदलले. याबाबत उदय सामंत म्हणाले की, किरण सामंत यांनी काल रात्री ९ वाजता आमच्या पक्षातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची व्हीसी झाली. त्यानंतर स्टेटस बदलला कारण मुख्यमंत्री शिंदे यांना त्रास होवू नये. या मतदारसंघावर उमेदवारीच जाहीर झालेली नाही. मग यावर आम्ही दावा करणारच. मुंबईत आता महत्त्वाच्या बैठकीसाठी जात असून मुख्यमंत्री, फडणवीस हे योग्य तो निर्णयही घेतील.

You cannot copy content of this page