निसर्गाचा लहरीपणा व वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी चिंतेत:शेतकऱ्यांच्या नुकसानीला वाली कोण..?
*⚡सावंतवाडी ता.१०सहदेव राऊळ -: निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे तालुक्यातील मळगाव-ब्राम्हणआळी परिसरातील उन्हाळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने गेल्या आठवड्यात पडलेल्या उष्णतेने येथील नाचणीची पातच पूर्णतः जळून गेल्याने नाचणीचे पीक पूर्णतः वाया गेले आहे. निसर्गाचा लहरीपणा व सतत होणाऱ्या वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे. एकंदरीत या उष्णतेने सर्व उन्हाळी पिके संकटात सापडली आहेत. इतर पिकांच्या नुकसानीबरोबर नाचण्याची झालेली ही अवस्था पाहून शेतकऱ्याला वाली कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान वन्य प्राण्यांच्या उपद्रवाबाबत शासनाला लेखी स्वरूपात कळवूनही दुर्लक्ष करत आहे.
यावर्षी थंडीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. तसेच मध्येच पाऊस, पावसाळी व ढगाळ वातावरण, मध्येच थंडी, मध्येच उष्णता याचा या सर्वच उन्हाळी पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळेही या पिकांचे बरेच नुकसान झाले आहे. त्यातच मागील आठवड्यात पडलेल्या उष्णतेने मळगाव-ब्राम्हणआळी परिसरातील उन्हाळी पिकाचे त्यात करून नाचणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या उष्णतेने नाचणीची पातच जळून गेली आहे. त्यामुळे त्याला कणीस येईल की नाही ही भीती शेतकऱ्यांमध्ये पसरली आहे. याबरोबरच चवळी, वाली, मुळा, लाल भाजी, मिरची, भुईमूग, उडीद, कुळीथ, मका आदी घेत असलेल्या उन्हाळी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
या ठिकाणी गवारेडे, माकड आदी वन्य प्राण्यांचा सतत उपद्रव होत असतानाही येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करत आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणा व वन्य प्राण्यांचा उपद्रव यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत शासनाला सांगूनही शासन याकडे लक्ष देत नसेल तर शेतकऱ्याने कोणाच्या तोंडाकडे पहावे, सतत होणाऱ्या या नुकसानामुळे पिकाचे बिजच शिल्लक राहिले नाही तर शेतकऱ्याने पिकवायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. शासन शेतकऱ्यांच्या या झालेल्या नुकसानीची भरपाई देईल का? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
