गणेशोत्सवासाठी विशेष बंदोबस्तावर भर:पोलीस–जनता समन्वय, शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत सकारात्मक चर्चा..
⚡सावंतवाडी, ता.०४-: सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनोज नाईक तसेच माजी नगरसेवक राजू बेग यांनीही पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले.
यावेळी सावंतवाडी शहर व तालुक्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नागरिकांमधील समन्वय अधिक प्रभावी असण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. शहरातील विविध प्रश्न, नागरिकांची सुरक्षितता तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक पोलीस बंदोबस्ताबाबतही चर्चा झाली.
येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाविकांची व नागरिकांची गर्दी होणार असल्याने वाहतूक नियोजन, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षिततेला विशेष प्राधान्य दिले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सांगितले. गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावा यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नूतन पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीतील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करत विशाल परब यांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी विनेश तावडे, केतन आजगावकर, विकास परब, ओंकार पावस्कर आदी उपस्थित होते.
