ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना निवेदन:दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
⚡सिंधुदुर्ग दि.०४-: बी. एन. विजयकर इंटरनॅशनल स्कूलमुळे बारावीच्या सहा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, आर्थिक व मानसिक नुकसान झाल्याचा आरोप करत ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष एम. डी. चौधरी यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.
संघटनेच्या वतीने शाळा व्यवस्थापनावर शिक्षणाच्या नावाखाली खोटी आश्वासने देणे, बनावट कागदपत्रांचा वापर करणे तसेच सहा विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरून काढण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यापूर्वीही ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना अनेक वेळा निवेदने देण्यात आली होती. या प्रकरणाच्या चौकशीनंतर पंचायत समिती कणकवलीच्या सभेत झालेल्या चर्चेनुसार संबंधित शाळेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. तसेच शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात नमूद केल्याचा दावा संघटनेने केला.
अहवाल उपलब्ध असूनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत अद्याप कोणताही ठोस मार्ग काढण्यात आलेला नसल्याचा आरोपही संघटनेने केला. तसेच संस्थाचालकांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता तो नाकारण्यात आल्याचा दावाही करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
या भेटीदरम्यान ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर, राष्ट्रीय निरीक्षक रामदास खोत, कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा समन्वयक प्रणय बांदिवडेकर तसेच पालक किशोर ठाकरे, कालिदास परब, सावंत, देवळेकर आदी उपस्थित होते.
