Headlines

सावंतवाडीत आचार्य बाळकृष्ण यांच्या वाढदिवसानिमित्त 8 दिवसीय निःशुल्क योग शिबिराचा उत्साहात शुभारंभ

सावंतवाडी, दि. 4 ऑगस्ट: नगरपरिषद सावंतवाडी, महाराष्ट्र योग शिक्षक संघ आणि फिटनेस योग फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य बाळकृष्ण यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित 8 दिवसीय निःशुल्क फिटनेस योग शिबिराचा उद्घाटन सोहळा आज उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि स्वामीजी व आचार्यजींच्या प्रतिमापूजनाने झाली. शिबिराचे उद्घाटन सावंतवाडी पोलीस निरीक्षक श्री. अमोल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वास शिर्के हे चिपळूणहून विशेष उपस्थित होते. तसेच नगरसेवक श्री. सुधीर आरीवडेकर, नगरसेविका सौ. दिपाली भालेकर, फिटनेस युवा अकॅडमीचे जिल्हा सचिव श्री. राजन राणे, सहसचिव श्री. महादेव सावंत, फिटनेस महिला कोषाध्यक्षा सौ. निशिगंधा सावंत, फिटनेस योग प्रचारक सौ. तृप्ती मालवणकर आणि योग मार्गदर्शक श्री. शेखर बांदेकर उपस्थित होते.

शिबिराचे सूत्रसंचालन सौ. अनघा चव्हाण यांनी तर प्रास्ताविक श्री. समीर हडकर यांनी केले.

याप्रसंगी बोलताना श्री. शेखर बांदेकर यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. आचार्यजींच्या वाढदिवसानिमित्त 54 औषधी वनस्पतींचे रोपटे वाटप करण्यात आले. यात गूळवेल, कोरफड, अॅलोवेरा, तुळस, हळद यांसारख्या वनस्पतींचा समावेश होता.

उद्घाटनानंतर श्री. शेखर बांदेकर व श्री. विश्वास शिर्के यांनी उपस्थित साधकांकडून सूर्यनमस्कार, विविध आसने व प्राणायामाचा सराव करून घेतला. शिबिराच्या पहिल्या दिवशी नवीन साधकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे शिबिर यशस्वी होत असल्याचे मत पोलीस निरीक्षक श्री. अमोल चव्हाण यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. विनया तावडे यांनी केले.

हे शिबिर दररोज सकाळी 5:30 ते 7:30 या वेळेत ऑनलाईन व प्रत्यक्ष स्वरूपात होणार आहे. सावंतवाडीतील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक श्री. सुधीर आरीवडेकर यांनी केले.

You cannot copy content of this page