अन्यथा 15 ऑगस्ट रोजी उपोषण: श्रेयस मुंज..
⚡सावंतवाडी, ता. ४-: सावंतवाडी नगरपरिषदेच्या संकुलातील गाळेपट्ट्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत श्रेयस साईनाथ मुंज यांनी जिल्हाधिकारी, नगरपरिषद आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर योग्य ती कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मुंज यांनी दिलेल्या निवेदनात एका व्यक्तीने अनेक गाळे ताब्यात ठेवणे, भाडे थकविणे, गाळे पोटभाड्याने देणे तसेच गाळेपट्ट्याच्या अटींचा भंग झाल्याचे आरोप केले आहेत. तसेच स्वतः दरमहा ३० हजार रुपये भाड्याने गाळे घेण्यास तयार असतानाही पुनर्लिलाव न करता केवळ भाडेवाढ करून गाळेपट्टे नूतनीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तक्रारीत नगरपरिषदेतील काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आले असून, संबंधितांकडे पुरावे असल्याचाही दावा करण्यात आला आहे. या आरोपांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा १५ ऑगस्टपासून उपोषण करण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
