Headlines

अवैध लिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्याविरोधात कुडाळमध्ये जनजागृती…

दिवाणी न्यायालय, वकील संघटना यांचे आयोजन :विधी स्वयंसेवकांना विशेष प्रशिक्षण..

⚡कुडाळ ता.०४-: अवैध लिंगनिदान आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जनजागृती अधिक प्रभावीपणे व्हावी, या उद्देशाने दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती, कुडाळ आणि तालुका वकील संघटना, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व बालरुग्णालय, कुडाळ येथे विधी स्वयंसेवकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालय आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार सोमवारी झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन कुडाळ येथील दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जी. ए. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला व बालरुग्णालय, कुडाळचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाळके होते.
प्रशिक्षणादरम्यान डॉ. वाळके यांनी PCPNDT Act, 1994 (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act) या कायद्याची सविस्तर माहिती दिली. भारतातील घटत चाललेले मुलींचे प्रमाण, भ्रूणलिंग निदानामुळे होणारे गर्भपात आणि त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच समाजात मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी जनजागृतीची आवश्यकता अधोरेखित केली.
यावेळी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल वाय. एम. वेंगुर्लेकर यांनी या कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया आणि पोलिसांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. तसेच कुडाळ वकील संघटनेच्या ॲड. सायली कुडाळकर यांनी कायद्याच्या विविध तरतुदी आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत माहिती दिली.
या प्रशिक्षणाचा लाभ कुडाळ न्यायालयातील विधी स्वयंसेवक श्रीमती पल्लवी जाधव, श्रीमती श्वेता कोळी, सिद्धेश पाताडे, गुरुनाथ दामले, श्रीमती सान्वी शिंदे तसेच महिला व बालरुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी घेतला. कार्यक्रमाचे नियोजन तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायालय, कुडाळचे वरिष्ठ लिपिक आर. टी. आरेकर आणि चपराशी जोगेश चव्हाण यांनी केले.

You cannot copy content of this page