जिल्हाध्यक्ष नितीन वाळके यांची माहिती:राज्याचे नेते उपस्थित राहणार असल्याचा केले जाहीर..
सिंधुदुर्गनगरी, प्रतिनिधी
ओबीसींच्या प्रश्नांवर जानेवारी महिन्यात सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने जनजागरण सभा आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती अध्यक्ष नितीन वाळके यांनी दिली आहे. या सभेला राज्यातून ओबीसी समाजाचे प्रमुख नेते उपस्थित राहतील अशी माहिती त्यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या प्रश्नांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षण समाज महासंघ सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सिंधुदुर्गनगरी येथे पार पडली. या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ समाजांचे अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने वैश्यवाणी, दैवज्ञ सोनार, तेली तसेच कुंभार समाजाच्या नावांमध्ये अडचणींविषयी चर्चा झाली. स्वतंत्र बैठक मागासवर्गीय आयोगासमोर घेण्यात येईल असे आश्वासन यावेळी जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी दिले.
‘महाज्योती’ची विस्तृत चर्चा
महाज्योती योजनेबाबत या बैठकीत विस्तृत चर्चा झाल्याची माहिती ओबीसी व आरक्षण समाज महासंघ सिंधुदुर्गचे प्रमुख पदाधिकारी काका कुडाळकर यांनी दिली. या योजनेसाठी हजारो कोटी रुपये दिले जातात याचा फायदा ओबीसी समाजाला मिळत नाही कारण यामागील अधिकाऱ्यांची अनास्था होय असेही ते म्हणाले महाचुतीचे कार्यालय रत्नागिरी जिल्ह्यात तसेच वस्तीगृह सिंधुदुर्गात हवे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती काका कुडाळकर यांनी दिली. यावेळी काका कुडाळकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ५८ टक्के वाटा आरक्षित समाजाचा असून अंदाजे ५,२५,००० पेक्षा जास्त या समाजाची लोकसंख्या आहे. यामध्ये प्रामुख्याने ओबीसी, एसबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हिजे यांचा समावेश आहे. आमच्या अनेक समस्या, मागण्या मागील अनेक वर्षे प्रलंबित असून याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेटून त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न असेल, असे काका कुडाळकर यांनी स्पष्ट केले.
मराठा समाज आरक्षण विरोध नाही : नितीन वाळके
आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या असेही आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षण समाज महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष नितीन वाळके यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणाबाबत चुकीचे गैरसमज पसरवले जात आहेत, ते दूर होणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले. जानेवारी महिन्यात महासंघाच्या वतीने ओबीसी प्रश्नांवर जनजागरण सभा सिंधुदुर्गात घेणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
यावेळी अध्यक्ष नितीन वाळके
कार्याध्यक्ष रमण वायंगणकर
सरचिटणीस ॲड. नंदन वेंगुर्लेकर
काका कुडाळकर, खजिनदार बाळा बोर्डेकर आनंद मेस्त्री, चंद्रकांत कुंभार, बाळ कनयाळकर, राजू पनवेलकर, महेश परुळेकर, मनोहर सरमळकर, सचिन पाटकर, दत्ताराम हिंदलेकर, रमेश बोंद्रे, डॉ. सतीश पवार, भरत आळवे, विकास वैद्य आदी उपस्थित होते.
