Headlines

कणकवलीकरांना ‘खाऊगल्ली’ची दरवर्षी आतुरता…

पालकमंत्री नितेश राणे:समीर नलावडे आणि सहकाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद : ‘एक दिवस छोट्यांचा-खाऊगल्ली’ला उत्स्फूर्त प्रतिसाद: नऊ वर्षांची परंपरा कायम..

⚡कणकवली ता.२९-: “गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या ‘एक दिवस छोट्यांचा-खाऊगल्ली’ या उपक्रमाची कणकवलीकरांना आता सवय झाली असून, नागरिक दरवर्षी या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये लहान मुलांसाठी मनोरंजनाच्या ज्या विविध सुविधा व उपक्रम पाहायला मिळतात, ते सर्व कणकवलीकरांसाठी उपलब्ध करून देण्याचे काम समीर नलावडे आणि त्यांचे सहकारी मेहनतीने करत आहेत. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी दर्जेदार उपक्रम राबविण्याची त्यांची तळमळ खरोखरच कौतुकास्पद आहे,” असे गौरवोद्गार राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी काढले.
समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एक दिवस छोट्यांचा-खाऊगल्ली’ या उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. गेल्या नऊ वर्षांपासून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे. यंदाही या उपक्रमाची नऊ वर्षांची परंपरा कायम राखत कणकवलीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, “काही कार्यक्रमांची कणकवलीकरांना वर्षानुवर्षे सवय लागली आहे. राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते असे विविध लोकोपयोगी व मनोरंजनात्मक उपक्रम सातत्याने राबवत असतात आणि कणकवलीकरांकडूनही त्यांना नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद व मोलाचे सहकार्य मिळत आले आहे.”
कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्साहाचे वातावरण निर्माण करणाऱ्या सर्व कणकवलीकरांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आभार मानले, तसेच या यशस्वी आयोजनाबद्दल समीर नलावडे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रमंडळाचे मनापासून अभिनंदन केले.

विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी सक्षमपणे पार पाडणार!

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहरातील जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा संदेश दिला आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून कणकवलीकरांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये आणि शहरात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये, यावर बारीक लक्ष ठेवण्याची अपेक्षा जनतेने आमच्याकडून केली आहे. ही जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. गेल्या काही दिवसांत आमच्या सहकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांना जाब विचारला आणि त्यांच्याकडून झालेल्या बाबी जनतेसमोर आणल्या, त्याबद्दल मला त्यांचा सहकारी म्हणून अभिमान वाटतो. आमचे नगरसेवक आणि सर्व सहकारी ज्या पद्धतीने विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहेत, त्यांचे मनापासून कौतुक करतो, असे नितेश राणे यांनी सांगितले.सक्षम विरोधी पक्ष असेल तर एक रुपयाचाही भ्रष्टाचार होऊ शकत नाही!विरोधी पक्ष सक्षम असेल तर सत्ताधाऱ्यांना एक रुपयाचाही भ्रष्टाचार करता येऊ शकत नाही, याचे उदाहरण गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाले आहे. कणकवलीकरांनी आम्हाला विरोधी पक्षात बसण्याची संधी दिली असली तरी ही जबाबदारी आम्ही तितक्याच सक्षमपणे पार पाडू. पुढील पाच वर्षे सत्ताधाऱ्यांना कोणतीही चुकीची बाब करता येणार नाही किंवा कणकवलीकरांवर अन्याय करता येणार नाही, याची काळजी आमचे सर्व सहकारी घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राणे साहेबांचे संस्कार घेऊन जनतेच्या सेवेत कमी पडणार नाही!सन्माननीय राणे साहेबांनी आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना जे संस्कार दिले आहेत, त्यातून सभागृहात आणि मैदानातही जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची भूमिका आम्ही पार पाडू. अन्याय होत असेल तर त्याविरोधात लढू आणि विकासाच्या बाबतीत सत्ता असो किंवा नसो, कणकवलीकरांसाठी त्याच ताकदीने काम करत राहू. यावेळी त्यांनी समीर नलावडे यांच्या लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या कार्याचाही उल्लेख केला. समीर नलावडे यांनी आतापर्यंत निस्वार्थीपणे आणि तळमळीने जनतेची सेवा केली आहे. आता आमचे नगरसेवक मैदानात उतरले आहेत, फक्त समीर मैदानात उतरणे बाकी आहे. आज त्यांच्या लाल कुर्त्याने योग्य संदेश दिला आहे. ते घरबसल्या कोणालाही संदेश देणार नाहीत, तर कणकवलीच्या सेवेसाठी यापुढेही तितक्याच तळमळीने काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे आवाहनसिंधुदुर्ग जिल्ह्यावर यंदा दुष्काळाचे सावट असून, येणारे काही महिने पाण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात पाण्याला विशेष महत्त्व देऊन त्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे. प्रशासन म्हणून दुष्काळाची झळ जनतेपर्यंत पोहोचू नये, याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहे. मात्र, नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, मुख्याधिकारी गौरी पाटील, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक बंडू हर्णे, सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, आर्या राणे, प्रतीक्षा सावंत, मनस्वी ठाणेकर, संजय कामतेकर, अनिस नाईक, अमोल रासम, बंडू गांगण, राजू गवाणकर, संदीप राणे यांच्यासह अन्य मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page