Headlines

लोकसहभागातून उभारलेल्या बंधाऱ्याचा पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून गौरव…

प्रशासन, लोकप्रतिनिधी, जनता आणि सामाजिक संस्था जलसंधारणासाठी एकवटल्या..

⚡सिंधुदुर्ग, दि.२९-: पाण्याची बचत आणि जलसंधारणासाठी लोकसहभागातून कणकवलीकरांनी उभारलेला मातीचा बंधारा हा जिल्ह्यासाठी आदर्श उपक्रम आहे. पाण्याचे योग्य नियोजन आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन राज्यासमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.

कणकवली शहरातील गडनदीवरील कनकनगर येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या बंधाऱ्याची पालकमंत्री नितेश राणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी या उपक्रमाचे कौतुक करत बंधारा उभारण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्था, पदाधिकारी आणि नागरिकांचे आभार मानले.

कणकवली तालुका व्यापारी संघ, रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल आणि स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हा बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्याची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्र्यांनी पाहणी केली.

यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, अशोक करंबेळकर, मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे, दीपक बेलवलकर, डॉ. सुहास पावसकर, विलास कोरगावकर, दयानंद उबाळे यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री राणे म्हणाले, कणकवली शहरात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या या बंधाऱ्याचा अभ्यास करून अशाच प्रकारचे उपक्रम जिल्ह्याच्या इतर भागांतही राबविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अशा प्रकारचे आदर्श बंधारे उभारण्याचे नियोजन असून, त्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

जिल्ह्यात बंधाऱ्यांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता त्यापुढील टप्प्यात अशा प्रकारचे वनराई बंधारे उभारून पाणी अडविणे, पाण्याची साठवण करणे आणि उपलब्ध जलस्रोत बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. भविष्यात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता कमीत कमी राहावी, यासाठी प्रशासन, जनता, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम सुरू केले आहे.

प्रत्येक विभागाच्या कामात काही अडचणी असल्या तरी अधिकारी जलसंधारणाच्या कामासाठी सकारात्मक असून, सर्व विभागांच्या समन्वयातून ही मोहीम अधिक प्रभावीपणे पुढे नेली जाईल. लोकसहभागातून उभे राहणारे असे उपक्रम जिल्ह्याच्या जलसुरक्षेसाठी निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वासही पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page