कुडाळ येथे महाविकास आघाडी व भाजपच्या नगरसेवकात धक्काबुक्की…

विकसित भारत संकल्प यात्रेतील गाडीवरील ‘मोदी सरकार’ शब्दाला आघाडीचा तीव्र विरोध.

⚡कुडाळ ता.२९-: कुडाळ नगरपंचायत येथे आज दुपारी ३.४० वाजता विकसित भारत संकल्प यात्रेला सत्ताधारी महविकास आघाडी गटाच्या नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यात्रेतील गाडीवर असलेल्या ‘मोदी सरकार’ शब्दाला तीव्र विरोध केला. याला प्रत्युत्तर देत भाजपच्या नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोदी सरकार समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही गटात झटापट होऊन धक्काबुक्की झाली. यावेळी दोन्ही गटांना नियंत्रणात आणताना पोलिस आणि दंगल नियंत्रक पथक पुरते हतबल झाले. या गोंधळातच भाजप गटाकडून यात्रेचे उद्घाटन करून विकसित संकल्प यात्रेच्या गाडीत बसविलेल्या स्क्रीनवरील योजनांची माहिती देण्यात आली. अखेर या गोंधळातच भाजप नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्याधिकार्‍यांना बोलावून घेत उपक्रमाची माहिती नागरिकांना दिली. मात्र सत्ताधारी गटाकडून या यात्रेचा निषेध करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस विकसित संकल्प यात्रा सुरू असून यामध्ये भारत सरकारच्या माध्यमातून विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जात आहे. ही नियोजित यात्रा आज, शुक्रवारी कुडाळ नगरपंचायत मैदानावर आली. या यात्रेतील “मोदी सरकार” या शब्दाला सत्ताधारी गटातील मंडळींनी आधीच विरोध केला होता. त्यामुळे वाद वाढेल या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने आपली कुमक वाढविली होती. हा कार्यक्रम सुरू होणार असतानाच सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्षा अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक तथा गटनेते मंदार शिरसाट, नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका सई काळप, नगरसेविका श्रेया गवंडे, अतुल बंगे आदिंनी पुढे येत या यात्रेचे आम्ही स्वागत करतो, परंतु, यात्रेतील रथावर मोदी सरकार उल्लेख आहे त्याला आमचा आक्षेप असल्याचे सांगत विरोध केला. यावेळी पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी सत्ताधारी गटाला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्ताधारी गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. त्यामुळे काहीसा गोंधळ सुरू झाला. याच दरम्यान भाजपा गटाच्या नगरसेविका संध्या तेरसे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करत कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे सत्ताधारी गटाचे नगरसेवक आक्रमक झाले. नगरपंचायतचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष असताना उद्घाटनाचा मान विरोधकांना का दिला? असा प्रश्न यावेळी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी नातू यांना केला. यावेळी पोलिस निरीक्षक मुल्ला यांनाही सत्ताधारी गटाने खडेबोल सुनावले. कार्यक्रम सुरू होताच भाजप नगरसेवक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोदी सरकार समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी दिली. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडी गटाकडूनही मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणचे वातावरण चांगले तापले होते. या परिस्थितीचे गांभिर्य पाहून पोलिसांनी दंगल नियंत्रक पथकाला पाचारण केले होते. यावेळी दोन्ही गटांना बाजूला करण्याचे पोलिस आणि दंगल नियंत्रक पथकाने प्रयत्न केले. परंतु, दोन्ही बाजूकडील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे पोलिस व दंगल नियंत्रक पथक हतबल झाल्याचे दिसून आले. याच वेळी योजनांची माहिती सुरू असलेल्या स्पिकरचा आवाज वाढविण्यात आल्याने त बंद करा अशी मागणी सत्ताधारी गटाने केली. यावेळी पोलिसांनी मुख्याधिकारी नातू यांना आवाज कमी करा अशी विनंती केली. मुख्याधिकारी नातू आवाज कमी करण्याच्या सूचना देण्यासाठी गाडी जवळ गेले. यावेळी भाजप नगरसेवक निलेश परब, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नगरसेवक ॲड. राजू कुडाळकर, आनंद शिरवलकर, राजू राऊळ, दादा साईल, आदींनी जोरदार विरोध करत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे नातू माघारी परतले. त्यानंतर पोलिस निरीक्षक मुल्ला आवाज कमी करण्यासाठी पुढे आले. त्याच दरम्यान गाडीत असलेले पोलिस सारंग यांच्यावर भाजप गटाने प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी पोलिस निरीक्षक मुल्ला व भाजपा नगरसेवक, पदाधिकार्‍यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. हा वाद कमी होतो न होतो तोच सत्ताधारी महाविकास आघाडी गटाकडूनही मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पुन्हा पोलिस निरीक्षक मुल्ला सत्ताधारी गटाकडे धावून आल्या. सत्ताधारी व विरोधक या दोन्ही गटांना थोपविण्यात पोलिस आणि दंगल नियंत्रक पथकाची दमछाक झाली. याच दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे दाखल झाल्या. त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारच्या गटाला शांत राहण्याची विनंती केली. मात्र, सत्ताधारी गट आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. अखेर भाजपा नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी अरविंद नातू यांना आपल्या गटाकडे बोलावून घेत कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थित नागरिकांना सांगण्याची विनंती केली. त्यानुसार मुख्याधिकारी नातू यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगत विविध योजनांचा लाभ घ्या असे आवाहन केले. त्यानंतर या गोंधळातच प्रार्थना घेण्यात आली. यावेळी सत्ताधारी गटाने कुडाळ नगरपंचायतच्या प्रथम नागरिक यांना डावलून पोलिसांनी हा कार्यक्रम कसा काय सुरू केला? असा सवाल उपस्थित करत पुन्हा एकदा मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी देण्यात आली. यावेळी पोलिसांनी भाजप नगरसेवक पदाधिकार्‍यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न फेल ठरला. याच दरम्यान प्रार्थना झाल्यानंतर कार्यक्रम गुंडाळण्यात आला असतानाच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर उपस्थित झाले. यावेळी नियोजित वेळेच्या आधी कार्यक्रम कसा काय संपविला? असा प्रश्न मुख्याधिकार्‍यांना विचारला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर परब यांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करत प्रशासक म्हणून तुम्ही कुचकामी आहात असा मुख्याधिकार्‍यांवर आरोप केला. या गोंधळानंतर मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी सायंकाळी उशिरा पोलिस स्थानकात धाव घेतली. दरम्यान या गोंधळामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत विकसित भारत यात्रेचा रथ त्या ठिकाणाहून हलविण्यात आला नाही.

You cannot copy content of this page