श्रावणधारा कार्यक्रमाच्या आधारे मराठी संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न…

⚡मालवण ता.०५-:
श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत मराठी विषयाच्या अंतर्गत ‘श्रावणधारा’ हा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. सध्याच्या आधुनिक युगामध्ये आपली पिढी ही पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण फार मोठ्या प्रमाणात करताना दिसते. हे थांबवणे कुठेतरी गरजेचे आहे. कारण मराठी संस्कृती टिकली तरच मराठी माणसाचे अस्तित्व टिकू शकते. हे निर्विवाद सत्य आहे. महाराष्ट्राची संस्कृती विशाल व समृद्ध आहे आणि या संस्कृतीची ओळख या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.

या कार्यक्रमासाठी भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मालवणच्या माजी प्राचार्या सौ एस एस टिकम या प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या. प्रशालेतील मुख्याध्यापक श्री. प्रसाद कुबल यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विषयाच्या शिक्षिका प्रतिभा केळुस्कर यांनी केले.चैतन्य, सौंदर्य आणि समृद्धी यांच्या त्रिवेणी संगमाने नटलेला श्रावणमास ‘श्रावणधारा’ कार्यक्रमाच्या रूपाने दाखवण्यात आला.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी श्रावण मासावर आधारित कवितांचे काव्यवाचन केले. त्याचप्रमाणे प्रशालेतील विद्यार्थ्यांनी श्रावण मासातील सण नागपंचमी, रक्षाबंधन,नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी, मंगळागौर, जिवती मातेचे व्रत,हरिनाम सप्ताह अशा विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांतून आपल्या कलागुणांना वाव देत संपूर्ण श्रावण मासाचे वास्तवदर्शी चित्रण प्रेक्षकांच्या समोर उभे केले. त्याच प्रमाणे प्रशालेत गीतगायन स्पर्धा आयोजित केली होती यामध्ये विद्यार्थ्यांनी भावगीत, भक्तीगीतांचे गायन करून प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेमध्ये २० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम क्रमांक यश बाळा कदम, द्वितीय क्रमांक गौरी बापू आंगणे तृतीय क्रमांक बाळकृष्ण भांडे व तन्मय वायंगणकर तृतीय क्रमांक असे अनुक्रमे क्रमांक काढण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रशालेतील शिक्षिका प्रतिभा केळुसकर व सौ. प्रीती सनये यांनी परीक्षक म्हणून भूमिका बजावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील विद्यार्थिनी कु. गौरी आंगणे हिने केले. तर आभार प्रशालेतील विद्यार्थिनी कुमारी प्राजक्ता कासले हिने मानले. या कार्यक्रमाच्या वेळी प्रशालेमध्ये माजी विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page