Headlines

मडुऱ्यात विजेअभावी दळण मिळेना

महिला वर्गातून तीव्र नाराजी : नागपंचमी सणवार विजेचे संकट

⚡बांदा ता.१९-: मडुरा पंचक्रोशीतील गावामधील वीजेचा प्रश्न काही केल्या सुटलेला नाही. नागपंचमीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना महावितरण कंपनीकडून वेगवेगळी कारणे देत वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. परिणामी सणाला पातोळ्यांसाठी लागणारे तांदळाचे दळण दोन दिवसांपासून पिठाच्या गिरणीवरच पडून राहिले आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराबद्दल महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.


मडुरा पंचक्रोशीत विजेचा खेळखंडोबा कायमच सुरू आहे. त्यासाठी उपोषणे करुनही त्यात सुधारणा झालेली दिसून येत नाही. परिसरातील वीज ग्राहकांना वारंवार वीजेच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लाईनमनकडून दररोज लाईन फॉल्टी असल्याचे सांगण्यात येते. याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना व व्यापाऱ्यांना होत आहे.
सोमवारी असलेल्या नागपंचमी सणाला तांदळाच्या पिठाच्या पातोळ्या बनविण्यासाठी महिलांनी मडुरा तिठा येथील श्री कुळाचारी राईस अँड फ्लोअर मिल येथे दळण ठेवण्यात आले आहे. मात्र वारंवार होणाऱ्या वीज खंडित प्रकारामुळे गिरणी व्यापारी हैराण झाले आहेत. परिणामी आम्ही व्यवसाय कसा करायचा व कर्ज कसे फेडावे असा सवाल केला जात आहे.
निदान सणासुदीला तरी वीज पुरवठा अखंडितपणे सुरू ठेवावा अशी मागणी मडुरा पंचक्रोशीतील ग्राहक, ग्रामस्थ, व्यापारी तसेच सर्वसामान्य लोकांतून होत आहे.

You cannot copy content of this page