शेकडो स्थानिक कामगारांचा मनसेत प्रवेश; प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडग्याचे व्यवस्थापनाकडून आश्वासन..
⚡बांदा ता.२२-: वाफोली येथील कायनेको एक्सल कंपनीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेची अधिकृत युनियन स्थापन करण्यात आली. यावेळी शेकडो स्थानिक कामगारांनी मनसे कामगार सेनेत प्रवेश केला. कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत कंपनी व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून, लवकरच योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस गजानन राणे, मनसे नेते शिरीष सावंत, जिल्हा संपर्काध्यक्ष संदीप दळवी, जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या उपस्थितीत युनियन स्थापनेची घोषणा करण्यात आली.
कंपनीमध्ये गेली दोन ते अडीच वर्षे स्थानिक शेकडो तरुण कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. बोनस, आरोग्यविषयक सुविधा, कामाच्या ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा तसेच इतर कामगार हक्कांबाबत वारंवार मागण्या करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना कामगारांनी व्यक्त केली होती. यासंदर्भात स्थानिक कामगारांनी मनसे पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतर यापूर्वीही कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्यात आली होती. मात्र अपेक्षित सुधारणा न झाल्याने अखेर कामगारांच्या हितासाठी अधिकृत युनियन स्थापन करण्यात आली.
यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी सविस्तर चर्चा करून कामगारांच्या सर्व प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. व्यवस्थापनानेही सकारात्मक भूमिका घेत संबंधित प्रश्नांवर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
युनियनच्या युनिट अध्यक्षपदी साईदत्त कदम, उपाध्यक्षपदी रोहिदास पांचाळ, सरचिटणीसपदी अनुज मेस्त्री, चिटणीसपदी वासुदेव कुडव आणि खजिनदारपदी योगेश सावंत यांची निवड करण्यात आली.
यावेळी सुधीर राऊळ, राजू कासकर, चिन्मय नाडकर्णी, सतीश आकेरकर, केतन सावंत, काशीराम गावडे, महेश परब, नरेश देऊलकर, सनी राणे, गणेश वाईरकर, राकेश परब, विष्णू वसकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.
फोटो:-
बांदा वाफोली येथील कंपनीत मनसे कामगार युनियनची स्थापना करण्यात आली.
