१२ ते १५ लाखांचे नुकसान

मालवण (प्रतिनिधी)
तारकर्ली येथे रापण नौकेला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. या दुर्घटनेत पारंपरिक रापण नौकेसह मासेमारीचे साहित्य आणि नौका ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले शेड जळून खाक झाले. या नुकसानीचा अंदाज १२ ते १५ लाख रुपये असून, नुकसानग्रस्त मच्छीमारांना शासकीय योजनांमधून अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी विभागाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता सुरू केली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
तारकर्ली येथील श्री महापुरुष कांदळगावकर रापण संघाच्या नौका ठेवण्याच्या शेडला शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी रात्री आग लागली होती. या आगीत नोंदणी क्रमांक IND-MH-5-NM-2132 असलेली पारंपारिक रापण नौका पूर्णपणे जळून खाक झाली. नौकेवरील मासेमारीचे साहित्य आणि संपूर्ण शेडचेही नुकसान झाले. नौकामालक गुंडू जानू कांदळगावकर यांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अंदाजे १२ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, शेडमध्ये असलेली दुसरी नौका उपस्थित मच्छीमारांच्या तत्परतेमुळे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तथा परवाना अधिकारी गणेश टेमकर यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी जळालेली नौका, मासेमारीचे साहित्य आणि शेडच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला. बाधित नौकामालकाला शासकीय अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची कार्यवाहीही करण्यात आली.
