Headlines

पिसेकामतेच्या सरपंच प्राजक्ता मुद्राळे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर

मतदानात ठरावाच्या बाजूने १६३, तर विरोधात ९० मते; २३ मते अवैध

कणकवली : तालुक्यातील पिसेकामते ग्रामपंचायतीच्या सरपंच प्राजक्ता नितीन मुद्राळे यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर सोमवारी, २६ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा घेऊन मतदान करण्यात आले. या मतदानात अविश्वास ठरावाच्या बाजूने १६३, तर ठरावाच्या विरोधात ९० मते पडली. तसेच २३ मते अवैध ठरली. मतदानाच्या निकालानंतर सरपंचांविरोधातील अविश्वास ठरावाला ग्रामसभेत बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले.

पिसेकामते ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी ६ ऑक्टोबर रोजी सरपंचांविरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्यानुसार १३ ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी सरपंच प्राजक्ता मुद्राळे यांनी सभापती यांच्याकडे राजीनामा सादर केला होता. राजीनाम्याच्या सत्यतेची खात्री करण्यासाठी २३ ऑक्टोबर रोजी बैठक निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार सात दिवसांची मुदत देण्यात आली. मात्र, अखेर २६ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा घेऊन मतदानाद्वारे अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यात आला.

गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश वालावलकर, विस्तार अधिकारी आर. एल. शिंदे, पी. जी. कदम, प्रमोद ठाकूर, विठ्ठल ठाकूर, प्रथम जाधव, कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी मनोज सावंत यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मतदानाच्या प्रभागनिहाय आकडेवारीनुसार, प्रभाग क्रमांक एकमध्ये ठरावाच्या बाजूने ८१, विरोधात २६ मते पडली, तर ९ मते अपात्र ठरली. या प्रभागात एकूण ११६ मते नोंदविण्यात आली. प्रभाग क्रमांक दोनमध्ये ठरावाच्या बाजूने ४२, विरोधात ५३ मते पडली, तर ५ मते अपात्र ठरली. या प्रभागात एकूण १०० मते नोंदविण्यात आली. प्रभाग क्रमांक तीनमध्ये ठरावाच्या बाजूने ४०, विरोधात ११ मते पडली, तर ९ मते अपात्र ठरली. या प्रभागात एकूण ६० मते नोंदविण्यात आली.

You cannot copy content of this page