प्रति गुंठा ८७ रुपये भरपाई तुटपुंजी; नितीन राऊळ यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

बांदा/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्यापोटी जाहीर करण्यात येणारी प्रति गुंठा ८७ रुपये नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे नुकसानभरपाईचे निकष बदलून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसानीच्या प्रमाणात वाढीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा पावसातील अनियमितता आणि प्रतिकूल हवामानामुळे भातशेतीला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी अनेक ठिकाणी भाताची पिके करपून गेली असून, शेतकऱ्यांनी बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी आणि शेतीच्या मशागतीवर केलेला खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात आले असले, तरी प्रति गुंठा केवळ ८७ रुपये भरपाई मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. या तुटपुंज्या मदतीतून शेतीचा खर्च भरून निघणे शक्य नसल्याचे राऊळ यांनी निवेदनात नमूद केले आहे.
अवकाळी पावसामुळे दुहेरी संकट
दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आधीच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेले उभे भातपीक तसेच कापणी करून ठेवलेले भात भिजून खराब होण्याची भीती आहे. शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांना दुहेरी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे. भातशेती हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा आधार असल्याने यंदाच्या प्रतिकूल हवामानाचा त्यांच्या आर्थिक नियोजनावर गंभीर परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत केवळ औपचारिक मदत न देता प्रत्यक्ष शेतीचा खर्च, पिकाच्या नुकसानीचे प्रमाण आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन भरपाई निश्चित करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नव्याने पंचनामे करण्याची मागणी
पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रश्नात तातडीने लक्ष घालून नुकसानभरपाईचे विद्यमान निकष नव्याने तपासावेत, प्रति गुंठा ८७ रुपयांची भरपाई वाढवून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत मंजूर करावी, अशी मागणी राऊळ यांनी केली आहे. तसेच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबरोबरच अलीकडील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची स्वतंत्र दखल घेऊन आवश्यकतेनुसार नव्याने पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशी नुकसानभरपाई मिळण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन नितीन राऊळ यांनी केले आहे.
फोटो:-
नितीन राऊळ.
