मालवणमध्ये अशोका विजयादशमी कार्यक्रम उत्साहात संपन्न

मालवण (प्रतिनिधी) :
बौद्ध समाजाने तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या जीवनमार्गावर चालण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन ॲड. उत्तम महादेव कदम यांनी केले.
दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या मालवण तालुका व शहर शाखेच्या वतीने अशोका विजयादशमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण नगरसेवक सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त नायब तहसीलदार आनंद मालवणकर होते.
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती आणि आजची परिस्थिती’ या विषयावर मार्गदर्शन करताना ॲड. कदम यांनी बुद्धांचा प्रज्ञा, शील, करुणा व मैत्रीचा संदेश तसेच सम्राट अशोक यांनी कलिंग युद्धानंतर स्वीकारलेला शांततेचा मार्ग यांचे महत्त्व विशद केले. बुद्धांचा धम्म आणि आर्य अष्टांगिक मार्ग आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कोकण विभागीय अध्यक्ष विद्याधर कदम यांनी डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या डॉ. भीमराव रामजी आंबेडकर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून समाजबांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात आनंद मालवणकर यांनी जीवनात बंधुभाव, मैत्री आणि करुणा जोपासण्याचे महत्त्व सांगितले. नगरसेवक सिद्धार्थ जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक महेश कोळंबकर यांनी केले. स्वागत बबन मालवणकर यांनी, सूत्रसंचालन संजय चौकेकर यांनी, तर आभार पुरुषोत्तम मालवणकर यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, विविध गाव शाखांचे प्रतिनिधी, फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाचे पदाधिकारी, ओझर प्रशालेचे मुख्याध्यापक दीपक जाधव आणि तालुक्यातील बौद्ध बांधव उपस्थित होते.
