रीलस्टार सिद्धेश चव्हाण यांचाही सत्कार

मालवण (प्रतिनिधी) :
देऊळवाडा येथील श्री ईस्वटी महापुरुष मंदिरात कोजागरी पौर्णिमेनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांसाठी मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी सुमारे २०० ताटे व वाट्या भेट दिल्या. त्यांच्या या उपक्रमामुळे मंदिरातील प्रसाद वितरण व्यवस्थेला मदत झाली.
मंदिरात कोजागरी पौर्णिमेनिमित्त धार्मिक विधी, ब्राह्मण भोजन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंदिराच्या गरजेनुसार ताटे-वाट्या उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी दीपक पाटकर यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना दीपक पाटकर यांनी, खासदार नारायण राणे यांच्याकडून मिळालेल्या जनसेवेच्या शिकवणीनुसार आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहराच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, पुणे येथे आयोजित रील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल मालवणचे रीलस्टार सिद्धेश चव्हाण यांचा दीपक पाटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नगरसेविका नीना मुंबरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, गणेश परब, श्री ईस्वटी महापुरुष मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
