मालवण : (प्रतिनिधी)

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या माय युवा भारत या स्वायत्त संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘कर्नाटकातील म्हैसूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी मालवण ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांची युवा प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. या निवडीमुळे त्यांना कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून, महाराष्ट्रातून निवड झालेल्या एकूण २५ युवा प्रतिनिधींमध्ये त्यांचा समावेश आहे.
सदर कॅम्प २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कर्नाटकातील म्हैसूर येथील BSNL रिजनल टेलिकॉम ट्रेनिंग सेंटर येथे पार पडणार आहे. या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमासाठी विविध राज्यांमधील निवडक युवा प्रतिनिधींची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये केरळ, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, मणिपूर आणि राजस्थान या राज्यांतील युवकांचा सहभाग असणार आहे.
या कॅम्प साठी मालवणच्या ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड झाली आहे. कायद्याचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी सामाजिक कार्य, युवकांचा सहभाग, पर्यावरण संवर्धन आणि विविध जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. वंदे मातरम् कॅम्पच्या माध्यमातून विविध राज्यांतील युवकांना एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करण्याची, विविध सामाजिक व राष्ट्रीय विषयांवर चर्चा करण्याची आणि युवकांच्या सहभागातून नेतृत्वगुण विकसित करण्याची संधी मिळणार आहे. या कॅम्पमध्ये सहभागी होऊन विविध उपक्रम, चर्चासत्रे आणि युवा नेतृत्वाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांना मिळणार आहे. या निवडी बद्दल ॲड. मांजरेकर यांचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.
