Headlines

नळ पाणी योजनेच्या कामासंदर्भात जोपर्यंत समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार…

अँड.अनिल निरवडेकर: तांत्रिक ऑडिटरच्या गैरहजेरीवर आक्षेप; २८ कोटींच्या खर्चाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याची केली मागणी …

⚡सावंतवाडी, ता. २६-: सावंतवाडी शहरातील सुमारे ५८ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेतील कामे, तांत्रिक लेखापरीक्षण आणि आर्थिक व्यवहारांच्या पारदर्शकतेबाबत उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. योजनेचे काम बंद पाडण्याचा आमचा उद्देश नसून, कामांचा आणि बिलांचा पारदर्शक लेखाजोखा जनतेसमोर मांडला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

२३ ऑक्टोबर रोजी झालेल्या विशेष सभेचा मुख्य विषय त्रयस्थ तांत्रिक लेखापरीक्षकांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणे हा होता. मात्र, ऑडिटर डॉ. हेडाव हे सभेला उपस्थित राहिले नसल्याने अॅड. निरवडेकर यांनी नाराजी व्यक्त केली. दोन तांत्रिक ऑडिट रिपोर्टसाठी सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च होत असताना, महत्त्वाच्या सभेत ऑडिटर उपस्थित नसल्यास त्यांच्या अहवालाबाबत प्रश्न कोणाला विचारायचे, असा सवाल त्यांनी केला. निवडणूक ड्युटीचे कारण देत ऑडिटर अनुपस्थित राहिले असल्यास सभा पुढे ढकलणे योग्य ठरले असते, असेही त्यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत आतापर्यंत कंत्राटदाराला सुमारे २८ कोटी रुपये अदा करण्यात आल्याचे सांगत, या खर्चाचा सविस्तर लेखाजोखा जनतेसमोर ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २५ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या बिलांचे नियमानुसार ऑडिट अपेक्षित असताना आतापर्यंतच्या सर्व ऑडिटचा एकत्रित अहवाल सादर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
डॉ. हेडाव यांनी सभागृहात उपस्थित राहून याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

कंत्राटदाराकडून नियमानुसार १० टक्के अनामत रक्कम ठेवणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात पाच टक्केच रक्कम ठेवण्यात आल्याचा आरोप करत, त्यामुळे सुमारे १ कोटी ४० लाख रुपये अधिक रक्कम कंत्राटदाराकडे गेल्याचा दावा अॅड. निरवडेकर यांनी केला. याबाबीचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेतील कामाच्या गुणवत्तेबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. करारनाम्यानुसार रस्ते खोदाई, माती भरणे, सोलिंग आणि खडीकरणाचे काम निर्धारित तांत्रिक निकषांनुसार झाले आहे का, याची तपासणी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात दुरुस्तीसाठी नगरपालिकेचा निधी खर्च होऊ नये, यासाठी कामाच्या गुणवत्तेची काटेकोर तपासणी आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

रस्त्यांच्या कामात हॉटमिक्सऐवजी कोल्डमिक्सचा वापर का करण्यात आला आणि त्याचा उल्लेख तांत्रिक ऑडिट रिपोर्टमध्ये का नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुदतवाढ दिलेली नसताना कामे सुरू कशी आहेत, असा प्रश्नही त्यांनी केला. तसेच, पाइपलाइनसाठी वापरण्यात आलेल्या निळ्या पाईप्सपैकी काही पाईप चेपलेले दिसत असून, त्यांच्या गुणवत्तेची तपासणी झाली आहे का, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हर्च्युअल बैठकीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे उपस्थित होत्या. या बैठकीत २८ कोटी रुपयांच्या खर्चाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे अॅड. निरवडेकर यांनी सांगितले. २८ मे रोजीचा शेवटचा ऑडिट रिपोर्ट असल्याचे सांगत, ९ जुलै रोजी पत्र दिल्यानंतर झालेल्या कामांचा अहवाल कुठे आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “मुख्याधिकाऱ्यांना कोणाचा वरदहस्त आहे?” असा सवाल करत, समाधानकारक उत्तरे मिळेपर्यंत तसेच खोदलेले रस्ते पूर्ववत (रिस्टोअर) होईपर्यंत पुढील काम होऊ देणार नाही, असा इशाराही अॅड. निरवडेकर यांनी दिला. योजना बंद पाडण्याचा कोणताही हेतू नसून, शहराला पाणीपुरवठा करणारी ही महत्त्वाची योजना पूर्ण झाली पाहिजे. मात्र, जनतेच्या पैशातून होत असलेल्या कामात पारदर्शकता असणे आवश्यक आहे. आगामी १० ते १५ दिवसांत या संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती जनतेसमोर आणली जाईल. कामांबाबतची संभ्रमावस्था दूर होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील, असे अॅड. निरवडेकर यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page