७ नोव्हेंबरला नरकासुर स्पर्धेचे आयोजन; युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते उद्घाटन

⚡सावंतवाडी, ता. २५-: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपावलीनिमित्त भव्य बॉडीबिल्डिंग तसेच नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बॉडीबिल्डिंग स्पर्धा १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जगन्नाथराव भोसले उद्यान येथे, तर नरकासुर स्पर्धा ७ नोव्हेंबर रोजी शिवरामराजे भोसले पुतळ्याजवळील मोती तलाव येथील अमोल आईस्क्रीमच्या समोर कॉर्नरला आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ या संकल्पनेतून देशभरात फिटनेसविषयक विविध उपक्रम राबविले जात आहेत. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभर सुरू असलेल्या ‘रन फॉर इंडिया’सह विविध उपक्रमांच्या माध्यमातून फिटनेसचा संदेश देण्यात येत आहे. याच संकल्पनेतून भाजप युवा मोर्चाच्या वतीने सावंतवाडीत भव्य बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे मूळचे गोवा येथील व दुबईस्थित आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर व विजेते निवेद शेटकर हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेला क्रीडाप्रेमी आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
या भव्य बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र भाजपचे युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिलजी निरवडेकर, तसेच युवा नेते विनोदजी राऊळ उपस्थित राहणार आहेत. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या दोन्ही स्पर्धांमुळे सावंतवाडीतील युवकांना क्रीडा व फिटनेसकडे प्रोत्साहित करण्याबरोबरच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळणार आहे.” तरी तमाम सावंतवाडीकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून युवकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
