पिंगुळीच्या श्री देव रवळनाथ भजन मंडळाचा प्रथम क्रमांक:२१ हजार रुपये आणि कायमस्वरूपी चषकाने गौरव..

⚡कुडाळ ता.२६-: श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ आयोजित कै. अॅड. अभय देसाई स्मृती ५१ व्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पिंगुळी येथील श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. या मंडळाला २१ हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र आणि कायमस्वरूपी चषक देऊन गौरविण्यात आले. देवगड-जामसंडे येथील स्वरब्रह्म भजन मंडळाने द्वितीय, तर पाट पंचक्रोशी येथील रामकृष्ण हरी भजन सेवा संघाने तृतीय क्रमांक मिळविला.
श्री देव कुडाळेश्वर मंदिरात ११ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील एकूण २२ भजन मंडळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.
द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या स्वरब्रह्म भजन मंडळ देवगड-जामसंडे यांना १५ हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र आणि कायमस्वरूपी चषक, तर तृतीय क्रमांकाच्या रामकृष्ण हरी भजन सेवा संघ, पाट पंचक्रोशी यांना १० हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र आणि कायमस्वरूपी चषक प्रदान करण्यात आला.
स्पर्धेत चौथा क्रमांक घोडगे येथील रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाने मिळविला. या मंडळाला पाच हजार रुपये रोख, प्रशस्तिपत्र आणि कायमस्वरूपी चषक देण्यात आला. पाचवा क्रमांक कोचरा येथील भूतनाथ प्रासादिक भजन मंडळाने मिळविला. या मंडळाला दोन हजार ५०० रुपये रोख, प्रशस्तिपत्र आणि कायमस्वरूपी चषक प्रदान करण्यात आला.
वैयक्तिक पारितोषिके अशी आहेत, लक्षवेधी भजन संघ म्हणून पावशी येथील श्री योगेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळाला एक हजार रुपये व प्रशस्तिपत्र देण्यात आले. उत्तेजनार्थ झांजवादक म्हणून घोडगे येथील रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाच्या चंदन ढवळ यांना ३०१ रुपये, उत्कृष्ट तबलावादक म्हणून केरवडे येथील जगन्नाथ प्रासादिक भजन मंडळाचे प्रणव परब यांना एक हजार रुपये, उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून राठिवडे येथील विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळाचे अक्षय परुळेकर यांना ५०१ रुपये, उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून वालावल येथील जैन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळाचे यश सावंत यांना ५०१ रुपये, तर उत्कृष्ट गायक म्हणून देवगड-जामसंडे येथील स्वरब्रह्म भजन मंडळाचे प्रसाद शेवडे यांना ५०१ रुपये व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक पप्पू पाटणकर, मानसी कुलकर्णी, ओंकार मालवणकर, श्री देव कुडाळेश्वर स्थानिक समितीचे अध्यक्ष महेश राऊळ, किशोर काणेकर, महेश कुडाळकर, सुरेश राऊळ, श्रीकृष्ण कुंटे, निलेश कुडाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री दुर्गादेवीच्या मंदिरात सलग १६ दिवस विविध प्रकारच्या सेवा करणारे दशरथ राऊळ, महेश मडवळ, रमेश मेस्त्री, अक्षया कासले, ओंकार मडवळ आणि सचिन कोंडसकर यांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत किशोर काणेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन महेश कुडाळकर यांनी केले.
