बांदा शहरात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवा…

साईप्रसाद काणेकर: चोरीच्या पार्श्वभूमीवर बांदा पोलीस निरीक्षकांकडे निवेदनद्वारे केली मागणी..

बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरात दोन दिवसांपूर्वी बंद बंगला फोडण्याची घटना घडली. तसेच वाहनांच्या बॅटऱ्या चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात रात्रीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी तसेच शहरात फिरणारे परप्रांतीय विक्रेते यांना तात्काळ शहरातून घालवून द्यावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी केली आहे. यासंदर्भात श्री काणेकर यांनी बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गणेश चतुर्थी सणाला महिना उरल्याने पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी. शहरात फिरणारे परप्रांतीय फेरीवाले, विक्रेते यांना शहरातून अन्यत्र हलवावे. शहरात काही परप्रांतीय युवक हे गाद्या घेऊन त्या विकण्यासाठी घरोघरी फिरत आहेत. अशा विक्रेत्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करावी.


शहरात चोरीच्या घटना घडत असून अनेक परप्रांतीय कामगार हे भाडेकरू म्हणून राहत आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने घर मालकांनी त्यांची संपूर्ण माहिती कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात द्यावी असेही शेवटी म्हटले आहे. यावेळी युवासेना शहरप्रमुख राजदीप पावसकर, ओंकार नाडकर्णी, ज्ञानेश्वर येडवे, भाऊ वाळके आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page