विद्यार्थिनींना वह्यांचे वितरण; आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना..
⚡मालवण ता.२२-:
शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा आणि विद्यार्थिनींना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने रोटरी क्लब मालवणच्या वतीने मालवण कन्याशाळेत विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच शाळेला इंटरॲक्टिव्ह बोर्ड आणि इयत्ता पहिली ते दहावीच्या संपूर्ण शालेय अभ्यासक्रमाचे डिजिटल शैक्षणिक सॉफ्टवेअर भेट देण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना डिजिटल माध्यमातून अधिक प्रभावी आणि समजण्यास सोपे शिक्षण मिळणार असून अध्यापन प्रक्रियाही अधिक आधुनिक आणि आकर्षक होणार आहे. इंटरॲक्टिव्ह बोर्डच्या साहाय्याने शिक्षकांना दृकश्राव्य माध्यमातून अध्यापन करता येणार असल्याने विद्यार्थिनींच्या आकलनक्षमतेत वाढ होण्यास मदत होणार आहे.
रोटरी क्लब मालवणच्या या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थिनींनी स्वागत केले. शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी रोटरी क्लब सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
कार्यक्रमास रोटरी क्लब मालवणचे माजी अध्यक्ष पंकज पेडणेकर, महादेव पाटकर, अभय कदम, बाळू तारी, प्रविणा शिंदे – सचिव, प्रदीप सामंत – खजिनदार, रंजन तांबे – माजी सचिव, रमाकांत वाक्कर , शाळेचे मुख्याध्यापक शिंदे सर, शिक्षकवृंद, विद्यार्थिनी तसेच मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी रोटरी क्लबच्या या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.
