Headlines

‘एक गुरु एक तरु’ उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश…

सिंधुदुर्गातील शिक्षकांना सहभागाचे आवाहन..

⚡वैभववाडी, ता. २२-:
एस. आर. दळवी फाउंडेशन व सिंधुदुर्ग टीचर फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनासाठी जिल्ह्यातील शिक्षकांसाठी ‘एक गुरु एक तरु’ हा नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. शिक्षक सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या दोन महत्त्वाच्या विषयांवर कार्यरत असलेल्या संस्थेच्या या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक शिक्षकाने स्वतः एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारायची आहे. लागवड केलेल्या वृक्षाचा जिओ-टॅग (Geo Tagged) फोटो ८५९१४३७१४२ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवायचा आहे. उपक्रमाचा कालावधी २१ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे.
या उपक्रमात अंगणवाडी सेविका, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन प्राध्यापक, व्यावसायिक शिक्षण संस्थांतील प्राध्यापक तसेच खासगी शिकवणीचे शिक्षक सहभागी होऊ शकतात. शिक्षकांना आपल्या पसंतीनुसार घराचा परिसर, शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करता येणार असून सहभागी सर्व शिक्षकांना फाउंडेशनच्या वतीने विशेष सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
याचबरोबर संस्थेने राज्यभरात यावर्षी १० लाख वृक्ष लागवड आणि १ कोटी सीडबॉल पेरणी करण्याचा संकल्प केला आहे. पर्यावरण जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा व रील स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असून त्यासाठी १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत नोंदणी करता येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी या पर्यावरणपूरक उपक्रमात सहभागी होऊन सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सिंधुदुर्ग टीचर फोरमचे जिल्हाध्यक्ष चेतन बोडेकर व सरचिटणीस अमर वाघमारे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page