Headlines

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ओरस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महाआरोग्य सेवा अभियानाचा शुभारंभ…

⚡सिंधुदुर्ग दि.२२-: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या आदेशानुसार जनसेवा सप्ताहांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महाआरोग्य सेवा अभियानाचा शुभारंभ आज (२२ जुलै) सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ओरस येथे करण्यात आला. हे अभियान २२ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत सर्वसामान्य नागरिकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी, विविध आजारांचे निदान, जनजागृती, आवश्यक वैद्यकीय तपासण्या, उपचारासाठी मार्गदर्शन तसेच आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या अभियानाच्या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून स्वर्गीय अजितदादा पवार यांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. अनंत देवांगे यांनी केले.

यावेळी मार्गदर्शन करताना आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य सेवा अभियानाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, नियमित आरोग्य तपासणी करून आजारांचे वेळेत निदान करून घ्यावे, असे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले, “स्वर्गीय अजितदादा पवार हे राज्यातील अत्यंत लोकप्रिय आणि अनुभवी प्रशासकीय नेते होते. ते अर्थमंत्री असताना मला त्या खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करण्याची संधी त्यांनीच मला दिली होती.” यावेळी त्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याला अभिवादन केले.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सावळाराम अनावकर (गुरुजी) यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत देवांगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सावळाराम अनावकर, भाजप ओरस मंडळाध्यक्ष भाई सावंत, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका (नर्सेस), कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page