भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा दावा
⚡मालवण ता.०९-: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी आपली राजकीय उंची तपासावी आणि नंतरच राणेंवर बोलावे. प्रसिद्धीसाठी टीकाटिप्पणी करणारे हरी खोबरेकर हे सध्या मालवणचे संजय राऊत बनले आहेत. ज्या आमदारांची तळी उचलण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, ते आमदार वैभव नाईक लवकरच ठाकरे गट सोडणार आहेत. आम. नाईक स्वतःच्या राजकीय स्थैर्यासाठी अद्यापही प्रयत्न करीत असून त्यांनी मागील आठ दिवसात तब्बल तीनवेळा भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, त्याचे पुरावेही आपल्याकडे आहेत, असा दावा भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
भाजपाच्या मालवण कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर हे बोलत होते. यावेळी शहरप्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, आपा लुडबे, मोहन वराडकर, ललित चव्हाण आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी श्री. चिंदरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील आठ दहा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी आमदार वैभव नाईक मतदार संघात दिसून आलेत का? त्यावेळी ते स्वतःच्या राजकीय स्थैर्यासाठी आमच्या नेत्यांच्या पुढे मागे फिरत होते. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी याबाबत आमदारांना कधीतरी खाजगीत विचारावे. आमदार नितेश राणे हे विधानसभेत ज्या आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात, तेवढा आक्रमकपणा वैभव नाईक सोडाच, ठाकरे गटाच्या अन्य कुठल्या आमदाराकडे आहे का? वैभव नाईक यांच्या कुडाळ मालवण मतदार संघात रस्ते, पाण्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी कधी प्रयत्न केले आहेत का ? असा सवाल श्री चिंदरकर यांनी केला.
आम. वैभव नाईक यांच्या निष्क्रियतेमुळे मागील दहा वर्षात मालवण कुडाळ मधील बहुतांश अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. येत्या काही दिवसावर गणेश चतुर्थी सण आला असून या रस्त्यांवरून वाळूचे डंपर फिरल्यास गणेशभक्तांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे वाळू व्यवसायिकांनी गणेश चतुर्थी होईपर्यंत वाळू व्यवसाय बंद ठेवावा, असे सांगून चिंदरकर म्हणाले ठाकरे गटाचे दलाल वाळूचे टेंडर काढण्यासाठी एका होडी मागे २५ हजारांची मागणी करत असल्याचा आरोप यावेळी चिंदरकर यांनी केला पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून बहुतांश रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र पावसामुळे ही कामे होऊ शकत नाहीत. गणेश चतुर्थी नंतर सर्व रस्त्यांना नुतनीकरणाला सुरुवात होणार आहे, असे सांगून आज राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे सरकार आहे. त्यामुळे वाळू व्यवसायिकांनी ठाकरे गटाच्या भूलथापांना बळी पडून वाळूचे टेंडर लावण्यासाठी रक्कम भरण्या केल्यास स्वतःच्या नुकसानीला ते स्वतः जबाबदार असतील. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असे धोंडू चिंदरकर म्हणाले.
