तारीख, वेळ ठिकाण जाहीर करा:भाजपतर्फे विजय केनवडेकर यांचे प्रतिआव्हान
मालवण (प्रतिनिधी)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी राणे बंधूनी तोंड सांभाळून बोलावे नाहीतर शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून धडा शिकवला जाईल, असा इशारा दिल्यानंतर हा धडा विकास कामांचा शिकवणार की शक्तीप्रदर्शनाचा ते खोबरेकर यांनी जाहीर करावे. भाजपचे कार्यकर्ते दोन्ही प्रकारच्या आव्हानांसाठी तयार आहेत. याबाबत तारीख, वेळ आणि ठिकाण खोबरेकर यांनी जाहीर करावे, असे प्रतिआव्हान भाजपचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिले.
मालवण येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विजय केनवडेकर हे बोलत होते. यावेळी भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, महेश सारंग, विलास मुणगेकर, नंदू देसाई, बाबू कदम, बाबू कासवकर, दादा कोचरेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, ललित चव्हाण, राकेश सावंत, निशय पालेकर, गौरव लुडबे, निनाद बादेकर, राज कांदळकर, चंद्रकांत मयेकर, राजा मांजरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी विजय केनवडेकर म्हणाले, शिवसेना ठाकरे गटाचे नेते भाजपा सोबत सत्तेत राहून नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करीत होते, असा बालिशपणा करणाऱ्या पक्षाने भाजपला कोणताही प्रोटोकोल सांगण्याचा प्रयत्न करू नये. नारायण राणे यांच्या सारख्या ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटा वरून अटक करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती ? असा सवाल विजय केनवडेकर यांनी उपस्थित केला.
हरी खोबरेकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या मतदार संघातील खड्ड्यावरून टिका केली आहे. मात्र हे खड्डे महाविकास आघाडी सरकारच्या मागील दोन वर्षातील कामकाजाचे कर्म आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात दोन वर्षात विरोधी आमदारांना कोणताही निधी न देता त्यांचा मानसिक छळ करण्याचे काम करण्यात आले. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपा युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर युती सरकारने प्रत्येक मतदारसंघात भरीव निधी देत विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम सुरू केले आहे. आज गगनबावडा घाटाला दीडशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या मार्गाची दुरुस्ती सुरू झाली आहे. त्याशिवाय नितेश राणेंच्या मतदारसंघात वेगवेगळ्या माध्यमातून विकासाचा निधी उपलब्ध होत असून कुडाळ मालवण मतदार संघात तुमच्या आमदारानी आणलेले सर्वच खड्डे आधी बुजवा नंतर आमच्यावर टीका करा, असेही विजय केनवडेकर म्हणाले
