⚡मालवण ता.०४-: येत्या काळात पर्यटन हंगामास सुरवात होणार असल्याने पर्यटन, हॉटेल व्यावसायिकांनी अद्ययावत रजिस्टर, आवश्यक परवानग्या, अल्पवयीन मुला-मुलींना ओळख पत्राशिवाय वास्तव्यास न ठेवता त्याची माहिती पोलिसांना द्यावी असे आवाहन मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी तोंडवळी तळाशील येथे बोलताना केले.
मालवण येथील पोलिस ठाण्याच्या वतीने मालवण तालुक्यातील तोंडवळी तळाशील या ठिकाणी काल गावभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान तोंडवळी तळाशील या ठिकाणी पोलीस निरीक्षक श्री. कोल्हे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पर्यटन व्यावसायिकांची बैठक घेत मार्गदर्शन केले. येणाऱ्या पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर सर्व हॉटेल व रिसॉर्ट व्यावसायिकांना सूचना दिल्या. यात येणाऱ्या पर्यटकांची पूर्ण माहिती घेउन त्यांची ओळखपत्रे यांची नोंदणी करुन रजिस्टर अद्ययावत ठेवणे, हॉटेल व रिसॉर्टच्या सर्व योग्य त्या परवानग्या नूतनीकरण करुन अद्ययावत ठेवणे, अल्पवयीन मुले, मुली यांना योग्य त्या ओळखपत्राशिवाय किंवा पालकांशिवाय/शिक्षकांशिवाय राहण्यास देवू नये. अशा पर्यटकांची माहिती तात्काळ पोलिस ठाण्यात द्यावी, परदेशी नागरिक तसेच पर्यटकांची माहिती तात्काळ पोलिस ठाण्यात कळवावी, परमिट रूम अथवा बार च्या परवानगी शिवाय मद्य साठा अथवा विक्री आढळुन आल्यास अथवा अंमली पदार्थ, किंवा रेव्ह पार्टी याविषयी महिती मिळुन आल्यास योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर सायबर फ्रॉड किंवा तत्सम कॉल पासुन सावध रहावे व असे कॉल आल्यास पोलिस ठाण्यात तक्रार करावी. तसेच तोंडवळी तळाशील हे गाव सागरी सुरक्षेच्या दृष्टीने आणि महत्वाचा लँडिंग पॉइंट असल्याने त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी तसेच हॉटेल व्यासायिकांनी आपल्या समस्या मांडल्या त्यावर त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सागर रक्षक सदस्य विवेक रेवंडकर यांचा सजग सागर रक्षक म्हणून सत्कार करण्यात आला. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पोलीस ठाणे किंवा नियंत्रण कक्ष ओरोस येथे संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
आपत्कालीन परिस्थिती मध्ये डायल १०९३ व ११२ वर कॉल करून त्वरित माहिती द्यावी अशी सूचनाही करण्यात आली.
या बैठकीस सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील, संजय केळुसकर तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि रिसॉर्ट व्यावसायिक ग्रामस्थ उपस्थित होते.
