गोवा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष तुषार केळकर यांचे दोडामार्गात प्रतिपादन; विशाल परब यांची गोव्यात देखील मोठी क्रेज..

⚡दोडामार्ग, ता.१४-: सिंधुदुर्गप्रमाणेच भाजपा युवा नेते विशाल परब यांची क्रेझ आता गोव्यातही पाहायला मिळत असून, त्यांच्या कार्याची आणि सामाजिक उपक्रमांची गोव्यातही चर्चा होत आहे. त्यामुळे आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत विशाल परब यांची स्टार प्रचारक म्हणून मागणी करणार असल्याचे प्रतिपादन गोवा राज्य युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तुषार केळकर यांनी केले.
विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळावा, या उद्देशाने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग येथे महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांना ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दोडामार्ग येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला तुषार केळकर यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विशाल परब यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. सिंधुदुर्गासोबतच गोव्यातही विशाल परब यांचे अनेक चाहते असून, त्यांच्या कार्याची चर्चा गोव्यात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वसामान्यांसाठी आरोग्य शिबिरासारखे उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना कौतुकास्पद असल्याचेही केळकर यांनी नमूद केले. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशाल परब यांना स्टार प्रचारक म्हणून गोव्यात आणण्याची मागणी पक्षाकडे केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
