⚡मालवण ता.०४-: स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम हा शालेय अभ्यासावरच आधारित असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने आतापासूनच तयारी करावी. अभ्यासाचे नियोजन व वेळेचा सदुपयोग करावा. विद्यार्थ्यांनी एक उद्दिष्ट ठरवून त्यानुसार वाटचाल करावी असे प्रतिपादन राज्यकर अधिकारी चंद्रहास टेमकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण तालुक्यातील वराड येथील सौ.वि.भा.वरसकर विद्यामंदिर व कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सुलभा सरमळकर (सौ. सायली चंद्रहास टेमकर) यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ वरसकर विद्यामंदिर मधील दहावी, अकरावी व बारावी इयत्तामधील मुलांचा कौतुक समारंभ आयोजित करत आईला आगळी वेगळी आदरांजली वाहिली. सुलभा सरमळकर यांचे पती व राज्यकर अधिकारी चंद्रहास टेमकर यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी चंद्रहास टेमकर हे बोलत होते. या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे सदस्य देवेन ढोलम, विनोद आळवे, वसंत वराडकर, सरपंच शलाका रावले, उपसरपंच श्री.परब, विद्याधर चिंदरकर तसेच चंद्रहास टेमकर, जयवंत मयेकर, सौ.तेंडुलकर, श्रीमती छाया हळदणकर, सानिका टेमकर, सलोनी टेमकर, सिद्धेश वराडकर आणि सरमळकर कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ.मयेकर यांनी केले. यावेळी सौ. सायली टेमकर व चंद्रहास टेमकर यांचा वरसकर विद्यामंदिर आणि माजी विद्यार्थी संघटनेकडून सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रहास टेमकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, करियर व स्पर्धा परीक्षा याबाबत मार्गदर्शन केले.
तर अध्यक्षीय भाषणात देवेन ढोलम यांनी शाळे विषयी माहिती देत या स्तुत्य उपक्रमाबाबत टेमकर दाम्पत्याचे कौतुक आणि आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मुळीक यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन वरसकर विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. मयेकर व शालेय समितीचे सदस्य वसंत वराडकर यांनी केले. यासाठी शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.
