गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांचे श्रावणधारा महोत्सवात प्रतिपादन
⚡दोडामार्ग,ता.०४-: केर भेकुर्ली गावाचे कार्य आदर्शवत आहे. या ग्रामपंचायतीचा आदर्श तालुक्यातील सर्व गावांनी घेतल्यास गावाचा विकास दूर नाही. केर – भेकुर्ली ग्रामपंचायतने गावात श्रावणधारा महोत्सव घेऊन तालुक्यात वेगळा ठसा उमटवला आहे,असे प्रतिपादन येथील गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांनी केले.
ग्रुप ग्रामपंचायत केर – भेकुर्लीचा श्रावणधारा महोत्सव व महाग्रामसभेचे उद्घाटन शुक्रवारी झाले.त्यावेळी श्री. सावंत बोलत होते. कार्यक्रमाची सुरवात खरा तो एकची धर्म या प्रार्थनेने व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपिठावर मृद व जलसंधारण अधिकारी आर. टी. धोत्रे, पोलिस निरीक्षक अरुण जाधव, विस्तार अधिकारी नीलेश जाधव, सुजित गायकवाड, नरेंद्र गावडे, जितेंद्र तायडे ,माजी सरपंच प्रेमानंद देसाई, सरपंच रुक्मिणी नाईक, उपसरपंच तेजस देसाई, हनुमंत गवस, ग्रामसेवक संदीप पाटील आदी उपस्थित होते.
श्री. सावंत म्हणाले, केर गावात एखादा उपक्रम, योजना राबविण्यासाठी प्रशासन म्हणून गटविकास अधिकारी तसेच माझ्या कार्यालयामार्फत कोणतेही सहकार्य हवे असल्यास ते देण्यात येईल.जैवविविधतेच्या संगोपनातील रानभाज्या, औषधी वनस्पती, दुर्मिळ नाणी आदींचे प्रदर्शनही लक्षवेधी ठरले.
ग्रामवासीयांची धडपड वाखाणण्याजोगी
शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात. यामध्ये वनविभागाच्या, कृषी विभागाच्या, महसूल विभागाच्या अनेक योजना आहेत. त्यांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. गाव विकासासाठी प्रत्येकाचे सहकार्य फार महत्वाचे आहे. तसेच गावात एखादी समस्या उद्भवल्यास आणि पोलिस प्रशासनाची गरज भासल्यास केव्हाही संपर्क करा आम्ही 24 तास उपलब्ध असणार आहोत. शिवाय गावात श्रावणधारा महोत्सवासारखे स्तुत्य उपक्रम राबविणे हे गावविकासासाठी नेहमी प्रेरक ठरतात. शिवाय गाव विकासासाठी ग्रामस्थांची दिसणारी धडपड ही वाखाणण्याजोगी आहे असे गौरवोदगार पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी काढले.
गावाचा विकास कसा करावा ते केर गावाकडून शिकावे
दोडामार्ग तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या गावात श्रावणधारा महोत्सव भरविणे तालुक्यासाठी आदर्शवत आहे. शासनाच्या अनेक योजना असतात त्या योग्यप्रकारे सर्व ग्रामस्थांना एकत्रित करून कशाप्रकारे राबवाव्या व गावाचा विकास कसा करावा ते केर गावाकडून शिकावे असे उद्गार सहायक गटविकास अधिकारी नीलेश जाधव यांनी सांगून सर्व ग्रामस्थांनी गावविकासासाठी नेहमी एकत्र येऊन झटावे , असे आवाहनही त्यांनी केले.
ओडीएफ प्लसमध्ये
सहभागाचा निर्णय
ओडीएफ प्लस या शासनाच्या उपक्रमात सहभागी होऊन शासनाने घालून दिलेल्या सर्व अटीशर्तीची पूर्तता करण्याचा संकल्प केर – भेकुर्ली येथील ग्रामस्थांनी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर केला.
