मणिपूरमधील अत्याचाराच्या निषेधार्थ मालवणात काढलेल्या मूकमोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद

दोषींवर कारवाई करण्याची निवेदनाव्दारे राष्ट्रपतीकडे मागणी !

⚡मालवण ता.०४-: महिलांवरील अत्याचाराचा निषेध असो…. सावित्रीच्या देशात महिलांवरील अत्याचार खपवून घेणार नाही… We Want Peace In Manipur… मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर विनाविलंब कारवाई करा… अशा आशयाचे फलक झळकवत आणि काळे कपडे परिधान करीत आज मालवणात समस्त मालवणवासियांनी मूक मोर्चा काढत मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त केला. तसेच मणिपूर येथे घडलेल्या घटनेमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याने या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे करून याबाबतचे निवेदन तहसीलदार वर्षा झालटे यांना देण्यात आले.

मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज मालवण शहरात ‘आम्ही भारताचे लोक’ या मथळ्या खाली मालवणातील नागरिकांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. मालवण देऊळवाडा येथील शांतीसागर येथून या मोर्चाला सुरुवात होऊन भरड येथून बाजारपेठ मार्गे फोवकांडा पिंपळ ते तहसील कार्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काळे कपडे परिधान करून तसेच काळे झेंडे व फलक घेऊन मालवणमधील नागरिकांसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

हा मोर्चा तहसील कार्यालय येथे आल्यानंतर कमल परूळेकर यांनी मोर्चाला संबोधित करत मणिपूर येथे महिलांवरील अत्याचार व घडत असलेला हिंसाचार याबाबत माहिती दिली. यावेळी नितीन वाळके, चारुशिला देऊलकर, स्वाती पारकर, हरी खोबरेकर, महेश जावकर, सेजल परब, शिला गिरकर, शिल्पा खोत, पूनम चव्हाण, श्वेता सावंत, गार्गी ओरसकर, मनोज गिरकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, पी. के. चौकेकर, सिद्धार्थ जाधव, तृप्ती मयेकर, अंजना सामंत, दिपा शिंदे, उमेश मांजरेकर, गौरव ओरसकर, मंदार ओरसकर, श्रीकृष्ण तळवडेकर, जेम्स फर्नांडीस, सरदार ताजर, महेश जावकर, बाबी जोगी, रुपेश प्रभू, संमेश परब, प्रतीक कुबल, संदीप लाड, जयमाला मयेकर, सुमेधा नाईक, भारती आडकर, स्नेहा शेलटकर, उषा यमकर, रुजारीओ पिंटो, आगोस्तीन डिसोझा, विद्या फर्नांडिस, निनाक्षी शिंदे, मेगल डिसोजा, ऐश्वर्य मांजरेकर, अक्षय रेवंडकर, राणी पराडकर, सिद्धिश्री माणगावकर, पायल आढाव, यांच्यासह अन्य महिला, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चाला शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय काँग्रेस, मनसे आदी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेत पाठिंबा दर्शवला.

यावेळी मोर्चात सहभागी नागरिकांच्या वतीने तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्याकडे राष्ट्रपती यांच्यासाठी असलेले निवेदन सादर करण्यात आले. आम्ही भारतीय नागरिक यांच्यावतीने राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, गेल्या काही वर्षात देशभरात महिलावर सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मणिपूरमध्ये माय बहिणीवर झालेल्या अत्याचार तर संपूर्ण मानवजातीला कलंक ठरला आहे. महिला अत्याचाराच्या या आणि अशा सतत घडणाऱ्या घटना आणि समाजमाध्यमातूनही महिलांवर होणारी अश्लाघ्य लैंगीक शेरेबाजी मुळे आज देशभरातील महिलांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण होत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अशा घटना घडल्यावर अत्याचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. आम्ही महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील संविधाननिष्ठ भारतीय नागरिक पिडीतांप्रती सहसंवेदना व्यक्त करत असतांनाच या निवेदनाद्वारे आपणास नम्र विनंती करीतो कि, मणिपूर आणि देशभरात अन्यत्र घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांचा आम्ही तीव्र निषेध करतो; या घटनां मधील दोषीवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश राष्ट्रपती या अधिकारात केंद्र व संबधित राज्य सरकारांना द्यावेत आणि अत्याचारांवर कठोरात कठोर शिक्षा होऊन कायमची जरब बसेल अशी कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्याय आली आहे.

You cannot copy content of this page