Headlines

कोकणच्या विकासासाठी शक्तिपीठ महामार्गाच्या मार्गात बदलाचा प्रयत्न…

आम. दीपक केसरकर: शहरात उद्या आयोजित करण्यात आलेल्या हर घर तिरंगा यात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, केसरकरांचे आवाहन..

सावंतवाडी : शक्तीपीठ महामार्ग थेट गोव्याबरोबरच कोकणातील रेडी बंदर, मुंबई गोवा महामार्ग, कोकण एक्सप्रेस सह प्रमुख महामार्गांना जोडला जावा. त्या दृष्टीने पुन्हा पाहणी करून सर्व्हे करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांनी दिले आहेत. हा महामार्ग जोडल्यास कोकण विकासाला आणि येथील स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल अशी माहिती, आमदार दीपक केसरकर यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, मतदार संघातील प्रमुख प्रश्नांबाबत मुंबईत बैठक झाली. यातील शक्तिपीठ महामार्ग सध्या ज्या पद्धतीने सुरू आहे त्याचा विशेषतः वेंगुर्ले बंदराच्या विकासाला अपेक्षित फायदा होणार नाही. त्यामुळे हा महामार्ग मळगाव येथून रेडी बंदर, मुंबई-गोवा महामार्ग आणि प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस हायवेला जोडला जावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. त्यांनी ती मान्य केली असून या मागणीबाबत लवकरच पुन्हा पाहणी करून सकारात्मक सर्वेक्षण (सर्वे) होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
कोकणातील पायाभूत सुविधांचा विकास करताना स्थानिक व्यापार आणि बंदरांचा वापर वाढणे आवश्यक आहे. शक्तीपीठ महामार्ग जर थेट गोव्याच्या दिशेने निघून गेला, तर स्थानिक अर्थकारणाला त्याचा फारसा लाभ मिळणार नाही.हा महामार्ग मळगाव येथून जोडणी मिळाल्यास रेडी बंदराच्या मालवाहतुकीला आणि विकासाला मोठी गती मिळेल.या कनेक्टिव्हिटीमुळे वेंगुर्ला बंदराच्या आर्थिक आणि पर्यटन विकासाला चालना देखील चालना मिळणार आहे.
शक्तीपीठ महामार्ग हा मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण एक्स्प्रेस हायवेला जोडल्यास वाहतूक अधिक जलद व सोयीस्कर होईल.
कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक व्यावसायिकांना थेट समृद्धीचा मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी या मार्गात बदल करणे गरजेचे आहे, असे सांगत या संदर्भातील सर्वेक्षणासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे आमदार केसरकर म्हणाले. दरम्यान या मार्गाद्वारे चौकुळ हा उंचावरील शेवटचा गाव देखील कनेक्ट केला जाणार आहे. तेथून तो दोडामार्ग तालुक्याला जोडला जावा तर पुढे तेरवण मेढे व मोर्ले पारगड ते कोनाळकट्टा व मुख्य रस्ता मिळतो त्या दोन पैकी एक मुख्य रस्ता द्वारे हा महामार्ग गोव्याला कनेक्ट होईल. त्यांनतर चंदगड गोवा मळगांव मार्गे दुसऱ्या कोकणातील रस्त्यांशी जोडेल असे केसरकर यांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्ग थेट कोकणशी जोडायला बांदा येथील शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फळ बागायती प्रभावित होईल परिणामी त्यात बदल करण्यात आला असून तो लागवडीचा भाग टाळता येईल याकरिता प्रयत्न आहेत. पुन्हा या महामार्गाचा सर्व्हे होऊन आंबोली चौकुळ पठार याना जोडला गेल्यास मोर्ले पारगड रस्त्या मार्गे दोडामार्ग तिलारी मार्ग नॉर्थ गोवा, साऊथ गोव्याशी कनेक्ट होईल अशी माहिती आम केसरकर यांनी दिली.

कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनससह मळगाव, न्हावेली आणि निरवडे परिसरासाठी नाबार्डच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या संदर्भातील आदेश दिले असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.विधानसभा मतदारसंघातील पाणी आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. इन्सुली ते आडाळी एमआयडीसीपर्यंत महत्त्वाची वीज वाहिनी टाकून दोडामार्ग तालुका व आडाळी एमआयडीसी भागातील वीज वितरण व्यवस्था बळकट केली जात आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये ४९ नवे उद्योग येणार असल्याने वीज वितरण कंपनीकडून वाहिन्या टाकण्याचे काम गतीने सुरू आहे. या कामात कोणतीही अडचण किंवा विरोध आल्यास संबंधितांशी संवाद साधून तो सोडवला जाईल; मात्र गरज भासल्यास पोलीस बंदोबस्तात काम पूर्ण केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मतदार संघातील भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासंदर्भात ऊर्जा राज्यमंत्री बोर्डीकर यांच्यासोबत आपली बैठक झाली. या भागात ५६ टक्के ग्रिन कव्हर असल्याने सातत्याने वादळात वीज प्रवाह खंडित होतो त्यामुळे अंडरग्राउंड वीज केबल टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी ११५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापनाला पाठविण्याचा आदेश देण्यात आला आहे. जंगलातून केबल न टाकता हायवेद्वारे ती टाकावी अशी सुचना केल्याचे त्यांनी सांगितले. दोडामार्ग वीज प्रश्न निकाली काढला जाईल तिथे कमी व्होल्टेज समस्या असून निरंतर वीज योजनेखाली ८० ठिकाणी नवे ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर गणपती पूर्वी ही कार्यवाही होणार असल्याचे आम केसरकर म्हणाले. आंबोली चौकूळ गावांना स्वतंत्र वीज वहिनी ब्रेकर्स दिले हजार आहेत तशी मान्यता मिळाली आहे.

दरम्यान, देशभरात ‘घर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमात सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले असून, त्याचाच एक भाग म्हणून उद्या, सोमवारी सावंतवाडी शहरात भव्य ‘तिरंगा यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत सावंतवाडी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रप्रेम जागृत ठेवावे, असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे.
या संदर्भात माहिती देताना आमदार केसरकर म्हणाले की, देशाप्रती प्रेम आणि आदर व्यक्त करण्याची ही एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. सावंतवाडी परिसरातील सर्व नागरिकांनी, युवकांनी आणि विविध क्षेत्रांतील बांधवांनी कोणतीही कसूर न ठेवता या राष्ट्रभक्तीच्या उपक्रमात सहभागी होऊन तिरंगा यात्रा यशस्वी करावी. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही सावंतवाडीतील या तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना विशेष निमंत्रण दिले आहे. उद्या होणाऱ्या या भव्य यात्रेमुळे सावंतवाडी शहरात संपूर्ण देशभक्तीमय वातावरण निर्माण होणार असून, सर्व घटकांनी आपले राष्ट्रप्रेम जागृत ठेवून या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले. तर सावंतवाडी आणि दोडामार्ग पंचायत समितीच्यावतीने अनुक्रमे १४ ऑगस्ट आणि १३ ऑगस्ट रोजी आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मध्यंतरीच्या काळात प्रशासकीय राजवट सुरू असल्यामुळे या आमसभांचे आयोजन थांबले होते. परंतु आता पंचायत समितीवर पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू झाल्यामुळे या आमसभा घेण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. दोडामार्ग आणि सावंतवाडी पंचायत समितीने आमसभा आयोजित करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव मांडला होता, त्यानुसार त्यांना अनुक्रमे १३ आणि १४ ऑगस्ट या तारखा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. या दोन्ही तालुक्यांमधील आमसभा पार पडल्यानंतर लवकरच वेंगुर्ले पंचायत समितीच्या आमसभेचे देखील नियोजन केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

You cannot copy content of this page