Headlines

गॅस सुरक्षिततेसाठी ‘मँडेटरी इन्स्पेक्शन’ आवश्यक…

अफवांवर विश्वास ठेवू नका:कुडाळ खरेदी-विक्री संघाचे आवाहन..

⚡कुडाळ ता.०९-: घरगुती एलपीजी गॅस कनेक्शनची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) व शासनाच्या नियमानुसार प्रत्येक गॅस ग्राहकाने दर पाच वर्षांनी अधिकृत मेकॅनिकमार्फत ‘मँडेटरी इन्स्पेक्शन’ करून घेणे बंधनकारक असल्याचे कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात काही ठिकाणी गैरसमज पसरविले जात असल्याने ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत प्रतिनिधींना सहकार्य करावे, असे आवाहन संघाच्या अध्यक्ष व संचालक मंडळाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, एचपीसीएल कंपनीच्या अधिकृत मेकॅनिककडून कंपनीच्या ॲपमधील निर्धारित निकषांनुसार घरगुती गॅस कनेक्शनची तपासणी केली जाते. तपासणीनंतर ग्राहकांना अधिकृत पावती दिली जाते तसेच गॅस कनेक्शनमधील त्रुटी किंवा सुरक्षेसंदर्भातील कमतरता समक्ष सांगितली जाते. ग्राहकांनी त्या त्रुटी तातडीने दूर करून गॅस कनेक्शन सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी.
तपासणीदरम्यान सुरक्षा पाईपची मुदत संपलेली असल्यास किंवा तो दोषपूर्ण आढळल्यास तो त्वरित बदलणे आवश्यक असून, त्यासाठी नियमानुसार शुल्क आकारले जाते. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा न झाल्यास एचपीसीएल कंपनीकडून गॅस पुरवठा खंडित करण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कुडाळ तालुक्यात काही ठिकाणी लोकप्रतिनिधींकडून या प्रक्रियेबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे निदर्शनास आले असून, त्याबाबत एचपीसीएल कंपनी आणि जिल्हाधिकारी यांना रीतसर माहिती देण्यात आल्याचे संघाने नमूद केले आहे.
ग्राहकांनी केवळ अधिकृत प्रतिनिधींनाच तपासणीसाठी सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करताना एचपीसीएलच्या ८ मे २०२६ रोजीच्या REF/NO/GLRO/2026/05/CIRCULAR/17 या परिपत्रकानुसारच ही तपासणी केली जात असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page