कुडाळ : विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे पौष्टिक, औषधी आणि पर्यावरणीय महत्त्व समजावे तसेच पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘निसर्गाची देणगी आपल्या ताटातील समृद्धी’ या संकल्पनेवर आधारित रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले.
जीवशास्त्र प्रयोगशाळेत झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन भरविण्याबरोबरच त्यापासून तयार केलेल्या पारंपरिक व पौष्टिक पाककृती सादर केल्या. या माध्यमातून रानभाज्यांचे संवर्धन, स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण आणि आरोग्यदायी आहाराचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. आर. वाय. ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्री. अरविंद शिरसाट होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष का. आ. सामंत, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चव्हाण, सरकार्यवाह अनंत वैद्य, सहकार्यवाह महेंद्र गवस, उपमुख्याध्यापक आर. डी. तेली आणि उपप्राचार्य एन. के. साळवी उपस्थित होते.
मनोगतात नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता शिरवलकर यांनी स्थानिक रानभाज्यांचे आरोग्यवर्धक गुण आणि त्यांचे दैनंदिन आहारातील महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात अरविंद शिरसाट यांनी विद्यार्थ्यांनी पारंपरिक ज्ञानाचे जतन करत पर्यावरण संवर्धनात सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले.
रानभाज्या पाककृती स्पर्धेचे परीक्षण डॉ. आर. वाय. ठाकूर, पी. बी. कदम आणि सौ. एस. के. वालावलकर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. पी. एस. ढेरे, पाहुण्यांचा परिचय सौ. व्ही. ए. नाखरे, सूत्रसंचालन सौ. पी. एस. लाड यांनी केले, तर आभार सौ. एस. एम. मोहिते यांनी मानले. विद्यार्थिनी कु. वैभवी जीवन कुडाळकर हिने रानभाज्यांपासून तयार केलेली रांगोळी आकर्षण ठरली.
निसर्ग, आरोग्य आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती यांचा सुंदर संगम घडविणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये रानभाज्यांविषयी जागरूकता आणि उत्सुकता निर्माण करणारा ठरला.
कुडाळ हायस्कूलमध्ये रानभाज्या प्रदर्शन व पाककृती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
