कुडाळ ता.०६-:
कुडाळ हायस्कूल इंग्लिश मीडियमच्या शिक्षिका युगा योगेश गावडे (३४, रा. माणगांव बंदीचामाड) यांचे गोवा-बांबुळी येथे गुरुवारी पहाटे ५.३० वा.च्या सुमारास निधन झाले. १५ दिवसापूर्वी त्यांना माणगांव येथील घरी सर्पदंश झाला होता. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, सासू, सासरे असा परिवार आहे.
कुडाळ तालुक्यातील माणगाव बंदीचा माड येथील युगा गावडे रविवार, १८ जून रोजी शाळेला सुट्टी असल्यामुळे घरी होत्या. घरी मागच्या बाजूला भांडी घासून त्या आत येत होत्या. याचदरम्यान उंबरठ्याच्या खाली पायरीमध्ये असलेल्या विषारी सापाने त्यांच्या पायाला अचानक दंश केला. यावेळी त्या ओरडल्या आणि त्यांनी पाय झटकून दिला असता त्या सापाने त्यांच्या पायाचा पुन्हा चावा घेतला. यावेळी घरातील मंडळींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दंश झालेला पाय वरच्या बाजूला नायलॉन कापडाने घट्ट बांधून ठेवला. त्यांना लगेच माणगाव प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे त्यांची प्रकृती खालावली म्हणून ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलविले. पण त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने अर्धावरुनच त्यांना गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले. युगा गावडे गोवा-बांबुळी येथे सायंकाळी ८ वाजता पोहोचल्यानंतर त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. त्या उपचाराला प्रतिसाद देतील अशी नातेवाईकांची आशा होती. पण त्या बेशुद्धावस्थेतून बाहेरच आल्या नाहीत. मागील १५ दिवस त्यांच्यावर गोवा-बांबुळी येथे उपचार सुरू होते. अखेर गुरुवारी पहाटे ५.३० वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्यांच्या मृतदेहावर माणगांव बंदीचा माड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या दीड वर्षाच्या मुलीला पाहून नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता.
