बिळवस सातेरी जलमंदिर जत्रेच्या नियोजनासाठी बैठक संपन्न

८ रोजी होणाऱ्या बैठकीला भाविकांसाठी सुयोग्य रांगांचे नियोजन:सहकार्य देण्याचे पोलीस निरीक्षक यांचे आश्वासन

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिराचा वार्षिक आषाढी जत्रोत्सव दि. ८ जुलै रोजी साजरा होणार असून आज सायंकाळी सातेरी मंदिरात जत्रा नियोजन आढावा बैठक पार पडली. दर्शन रांगांची सुयोग्य व्यवस्था करण्यात येऊन भाविकांना पावसामुळे त्रास होऊ नये याचीही काळजी घेतली गेली असल्याचे यावेळी मंदिर ट्रस्ट कडून स्पष्ट करण्यात आले. तर या जत्रेसाठी पोलिसांचे आवश्यक ते सहकार्य लाभेल असे आश्वासन मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी ग्रामस्थांना दिले.

पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी सरपंच सौ मानसी पालव , मसुरे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस श्री. नाईक, सातेरी देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाई सावंत व सर्व विश्वस्त , ग्रा. पं. सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते संतोष पालव, पोलीस पाटील विकास सावंत, पोलीस पाटील जाधव, गोपाळ पालव, सुबोध पालव, मोहन पालव, विश्वास पालव, अनंत पालव, संजय पालव, रवींद्र तांबे, पांडुरंग पालव, सत्यवान पालव, मंगेश पालव, मनोज पालव, रोशन पालव, महादेव पालव, पंढरीनाथ पालव, अरुण पालव, समीर पालव, भावेश पालव यांसह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री देवी सातेरीच्या जत्रेत सकाळी ९ वाजल्यासून देवीची ओटी भरण्यास सुरुवात होणार आहे. तर १ वाजता देवीला ताटे लावण्याचा (नैवेद्य दाखविणे) कार्यक्रम होणार असून त्याच वेळी भाविकांसाठी ग्रामस्थांच्या घरी महाप्रसाद आयोजन होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

देवीच्या दर्शनासाठी सुयोग्य असे दर्शन रांगांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मंदिराबाहेर रांगामध्ये असणाऱ्या भाविकांना पावसाचा त्रास होऊन नये म्हणून पत्र्यांची शेड करण्यात आली आहे. तसेच भाविकांसाठी निवारा शेडही उभारण्यात आली आहे. जत्रेदिवशी मंदिर मार्गावरील एसटी बस वाहतूक व चार चाकी वाहतूक एक मार्गी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर ट्रस्ट तर्फे देण्यात आली.

जत्रेच्या आयोजनाबद्दल जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी व मालवण तहसीलदार यांना निवेदन देऊन जत्रेस येण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. या जत्रेला भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने अधिकाऱ्यांनी जत्रेस येऊन जत्रा नियोजनाची पाहणी करून काही त्रुटी असल्यास त्या लक्षात आणून द्याव्यात यासाठी अधिकाऱ्यांना बोलविले जाते. मात्र अधिकारी जत्रेवेळी फिरकत नसल्याची खंत यावेळी ट्रस्ट पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी पोलीस निरीक्षक कोल्हे यांच्यासमोर व्यक्त केली. मात्र या जत्रेस पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येईल तसेच आवश्यक सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक कोल्हे यांनी दिले.

भाविकांनी या जत्रोत्सवात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ व समस्त बिळवस ग्रामस्थ यांनी यावेळी केले.

You cannot copy content of this page