माजी विद्यार्थी अंकीत सैनी याचे जेईई ॲडव्हान्स परीक्षेत देदीप्यमान यश
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२५-: सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की, जेईई ॲडव्हान्स ही परीक्षा, म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी नसतेच. आणि सर्वसामान्य विद्यार्थी या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकत नाही. पण आपली हीच धारणा चुकीची ठरवली आहे ती परफेक्ट अकॅडेमी सिंधुदुर्ग यांचा विद्यार्थी कुमार अंकीत गजानन सैनी याने.
अंकीतचे वडील गजानन सैनी हे मूळचे राजस्थानचे बांधकाम व्यवसायिक. सन २०२० मध्ये अंकीत जेमतेम ६७% गुण घेऊन दहावी उत्तीर्ण झाला, आणि पुढे त्याचे आयआयटीमध्ये जाण्याचे स्वप्न उराशी असल्याने त्यांनी बऱ्याचशा कोचिंग सेंटरमध्ये प्रवेशासाठी अर्ज केला.
परंतु कोरोना महामारी आणि अंकीतला दहावीत असलेले कमी गुण यामुळे त्याला मोठ्या कोचिंग कलासेसमध्ये प्रवेश मिळणे अवघड होते. तसेच बऱ्याच जणांनी त्याला “तू आयआयटीच्या नादी लागू नको ..!”, असा देखील सल्ला दिला. परंतु परफेक्ट अकॅडेमीचे सर्वेसर्वा प्राध्यापक राजाराम परब यांनी आणि त्यांच्या सहकार्यानी अंकीतला विशेष मार्गदर्शन करत त्याच्याकडून दोन वर्षे उत्तम मेहनत करून घेतली. आणि आपल्या मेहनती आणि चिकाटीच्या जोरावर २०२२ मध्ये अंकीतने जेईई मेन परीक्षेत ९०% तर एमएचटी-सीईटी परीक्षेत ९५ टक्के गुण घेतले. या गुणांच्या आधारे महाराष्ट्रात अव्वल समजल्या जाणाऱ्या सीओईपी कॉलेजमध्ये त्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची संधी चालून आली. इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेशाची संधी असताना देखील अंकीतने स्वतःच्या मेहनतीवर विश्वास दाखवत, पुन्हा एकदा जेईई ॲडव्हान्स परीक्षेत बसण्याचा निर्णय घेतला. आणि त्याच्या २०२२ च्या मार्कांमुळे त्याला कोटाच्या सुप्रसिद्ध कोचिंग मध्ये टॉप ५० विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश मिळाला. या संधीचा फायदा उचलत, अंकीतने यावर्षी जेई ई ॲडव्हान्स परीक्षेत भारतात प्रथम १००० विद्यार्थ्यांमध्ये येण्याचा मान पटकावला आहे. तसेच जेईई-मेन्स परीक्षेत त्याने तब्बल ९९% गुण घेतले तर एमएचटी-सीईटी मध्ये देखील त्याला ९९% गुण मिळाले. या देदीप्यमान यशाचे श्रेय अंकीतने आपल्या आई-वडिलांना, तसेच त्याला नेहमी प्रोत्साहन करणाऱ्या प्राध्यापक राजाराम परब आणि त्यांच्या परफेक्ट अकॅडेमीच्या टीमला, तसेच गतवर्षी त्याला मार्गदर्शन करणाऱ्या कोटाच्या काही शिक्षकांना दिले आहे. अंकीतचे हे यश सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्थान ठरेल, असे मत प्राध्यापक परब यांनी अंकीतच्या सत्कारावेळी व्यक्त करीत कोणीही आपल्याला कमी लेखू नाही प्रत्येक विद्यार्थी हा विशेष असून आपल्या अंगी असलेल्या प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर तो यशस्वी होऊ शकतो असेही उद्गार प्राध्यापक राजाराम परब यांनी काढले.
