गृह चौकशीद्वारे गाबित जात पडताळणीचा प्रश्न अधिवेशनात मांडावा

गाबीत समाजाची आम. वैभव नाईक यांच्याकडे मागणी

⚡मालवण ता.१४-:
गृह चौकशीद्वारे गाबित जात पडताळणी व्हावी ही गाबीत समाजाची मागणी अधिवेशनात मांडावी अशी मागणी मालवण तालुका गाबीत समाजातर्फे आमदार वैभव नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबतचे निवेदन आमदार वैभव नाईक यांना सादर करण्यात आले. यावेळी गाबीत समाज मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळबंकर, जिल्हा सरचिटणीस महेंद्र पराडकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य हरी खोबरेकर, बाबी जोगी, मालवण खजिनदार मिथुन मालंडकर, सदस्य भाई कासवकर, संतोष ढोके, नरेश हुले, भाऊ मोरजे, माजी नगरसेवक पंकज सादये, तोंडवळी माजी सरपंच संजय केळुसकर, सन्मेश परब, हेमंत मोंडकर, प्रशांत तोडणकर, प्रवीण मेस्त, निनाक्षी मेतर आदी उपस्थित होते.

हिंदु-गाबित समाजाचे वास्तव्य मुख्यत्वे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण आणि वेंगुर्ले या किनारपट्टी भागासह सावंतवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. व्यवसाय आणि नोकरीनिमित्त या समाजातील काही लोक अन्यत्र स्थलांतरीत आहे. हिंदु-गाबित समाजाची संख्या काही हजारातच आहे. ‘हिंदु-गाबित’ समाजातील अनेक व्यक्तींना जात पडताळणीची तांत्रिक समस्या भेडसावते आहे. कारण त्यांना १९६७ पूर्वीचा रक्ताच्या नात्यातील जातीचा पुरावा अनेक ठिकाणी शोधून सापडत नाहीय. तरी अशा गाबित लोकांची जात पडताळणी प्रक्रिया कायदेशीररित्या पूर्ण व्हावी याकरीता गृह चौकशीचा पर्याय अवलंबिला जावा अशी आमची मागणी असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. तरी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा तसेच मुद्दा महाराष्ट्र राज्याच्या येत्या पावसाळी अधिवेशनात मांडावा, अशी मागणी गाबीत समाजाने आम. नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page