⚡बांदा ता.१४-: वाफोली पंचक्रोशीतील वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीज ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागतो. पावसाळा नुकताच सुरू झाला असून पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आहेत. परंतु वादळी वाऱ्याचे कारण सांगून महावितरणच्या अधिकाऱ्यांनकडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते.पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी विद्युत प्रवाहाला अडथळा करणारी झाडे न तोडल्यामुळे व विद्युत ताराही सुरळीत नसल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होतो.त्यामुळे विजेचा लपंडाव सुरूच आहे. वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्राहकांची विजेवर चालणारी उपकरणे नादुरुस्त होत आहेत.याला महावितरण अधिकारीच सर्वस्वी जबाबदार असल्याचे मत सर्व सामान्य नागरिकांनी व्यक्त केले.
मान्सूनपूर्व व्यवस्थित कामे केली असती तर ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागला नसता.अवाच्या सव्वा वीज बिल आकारणी करतात बिलही वसूल करतात मग वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा नागरिकांसह महावितरणच्या कार्यालयात येऊन आंदोलन छेडण्याचा इशारा वाफोली उपसरपंच विनेश गवस यांनी दिला.
