⚡बांदा ता.१४-: मडुरा गावात गेल्या आठ दिवसांपासून वीजेचा खेळखंडोबा सुरु झाला आहे. आधीच उष्म्याने त्रस्त नागरिक वारंवार वीज गायब होत असल्याने पुरते हैराण झाले आहेत. मान्सूनपूर्व लाईनच्या साफसफाईची कामे न केल्याने भविष्यात वीज ग्राहकांना आणखीनच समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. बांदा येथील सहाय्यक अभियंता कार्यालयही बंद असल्याने आमच्या समस्या मांडाव्यात तरी कोणाकडे ? असा सवाल वीज ग्राहक करीत आहेत.
गतवर्षीच्या वादळात मडुरा गावात तब्बल १२ दिवसांनंतर वीज आली होती. मात्र त्यापासून महावितरणने कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. गावात ठिकठिकाणी वीज तारा झुडपांमध्ये अडकलेल्या आहेत. वीजवाहिन्यांवर झुडपे वाढल्याने वीज गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यावर तात्पुरती मलमपट्टी करुन वेळ निभावून नेण्याचे प्रकार सुरु आहेत. समस्येवर ठोस उपाययोजना केली जात नसल्याचा वीज ग्राहकांचा आरोप आहे.
मडुरा गावात वायरमनला सहाय्यक कर्मचारी महावितरणने नियुक्त केला आहे. मात्र, समस्या कमी झालेल्या नाहीत. भरमसाठ वीज बीले व वारंवार वीज गायब होणे यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. महावितरणने तातडीने वीजवाहिन्यांवरील झुडपांची सफाई करावी. अन्यथा वीजवितरण कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा संतप्त वीज ग्राहकांनी दिला आहे.
मडूरेत वीजेच्या खेळखंडोबाने ग्राहकांमध्ये संताप
