अभियंता गणेश साखरे यांच्यावर केला प्रश्नांचा भडीमार
मालवण (प्रतिनिधी)
पर्यटन गाव असलेल्या देवबाग मध्ये सातत्याने भेडसावणाऱ्या वीज समस्यांबाबत वीज वितरण कंपनी कोणतीही कार्यवाही करत नसल्याने संतप्त बनलेल्या देवबागवासियांनी आज मालवणात वीज वितरण कंपनी कार्यालयावर धडक दिली. यावेळी वीज अधिकारीच उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत कार्यालयातील कामकाज बंद पाडत सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढत कार्यालयाला टाळे ठोकले. यानंतर तासाभराने दाखल झालेले वीज अभियंता गणेश साखरे यांना कार्यालयाबाहेरच भर उन्हात उभे करून ग्रामस्थांनी त्यांच्यावर देवबाग मधील वीज प्रश्नांची सरबत्ती करीत फैलावर घेतले.
दरम्यान, यानंतर ग्रामस्थांनी पोलीस स्थानकात धाव घेत वीज समस्यांबाबत ग्रामस्थांना मनस्ताप दिल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. तसेच देवबाग मधील वीज समस्या सोडविण्यासाठी ठोस कार्यवाही सुरु होत नाही तोपर्यंत कार्यालय बंदच राहील, अशी भूमिका ग्रामस्थांनी कायम ठेवली असून आज सायंकाळ पर्यंत वीज कार्यालया समोर पोलिस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.
देवबाग गावात गेले दोन महिने सतत कमी दाबाचा व खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे ग्रामस्थ व पर्यटन व्यावसायिक त्रस्त आहेत. याबाबत वेळोवेळी लक्ष वेधूनही वीज वितरण कंपनी कार्यवाही करत नसल्याने काल देवबागचे सरपंच उल्हास तांडेल यांनी वीज कार्यालयावर धडक देणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज सकाळी देवबाग ग्रामस्थांनी सरपंच उल्हास तांडेल यांच्या नेतृत्वाखाली मालवणच्या वीज कार्यालयावर धडक दिली. मात्र पूर्व इशारा देऊनही वीज अभियंता गणेश साखरे हे कार्यालयात उपस्थित नसल्याने ग्रामस्थांच्या रागाचा पारा चढला. देवबाग गावात सातत्याने वीज पुरवठा खंडित होऊन आम्ही गर्मीने त्रस्त होत असताना तुम्ही वीज कर्मचारी कार्यालयात फॅन खाली बसून काम करत आहात, असे यावेळी ग्रामस्थांनी सांगत कार्यालयातील सर्व फॅन बंद करतानाच कर्मचाऱ्यांना कामकाजही बंद करण्यास भाग पाडले. वीज बिल भरणा खिडकीही बंद करण्यास लावली. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला टाळे ठोकले. या आंदोलनाबाबत पूर्व कल्पना दिलेली असल्याने यावेळी मालवण पोलीसांनी चोख बंदोबस्त वीज कार्यालय परिसरात ठेवला होता.
यानंतर सुमारे दीड तासाने हजर झालेले वीज अभियंता गणेश साखरे यांना ग्रामस्थांनी कार्यालयाबाहेरच रोखून उन्हात उभे करून देवबागच्या वीज समस्यांबाबत जाब विचारला. पर्यटनाचे प्रमुख केंद्र म्हणून देवबाग गावची ओळख आहे. मात्र देवबाग गावात मागील दोन महिने सतत वीज खंडित होण्याचे प्रकार दिवसरात्र सुरू आहेत. या गावात सर्वाधिक व्यावसायिक मीटर आहेत, सर्वाधिक वीजबिल वसुली होते, अशा गावात वीज सेवा सुरळीत नसल्याने पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम झाला. तसेच घरगुती उपकरणे नादुरुस्त बनली. गरमी मुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे, अशी समस्यांची जंत्रीच ग्रामस्थांनी मांडली.
तसेच देवबाग विभागाच्या महिला वीज अधिकारीही सहकार्य करत नाहीत. त्यांच्याकडून अपेक्षीत काम होत नाहीत. त्यामुळे समस्या अधिक वाढल्या आहेत, असेही ग्रामस्थांनी सांगितले. वीज खांब, वीज तारा जीर्ण झाल्या आहेत. त्याही बदलण्याची कार्यवाही होत नाही. दोन वर्षांपूर्वी झालेल्या तौक्ते वादळानंतर देवबाग मधील वीज खांब, वीज वाहिन्या नवीन करण्यासाठी कोणती कार्यवाही केली, कोणते प्रस्ताव पाठविले ? अशी विचारणाही ग्रामस्थांनी केली. यावेळी अभियंता साखरे यांच्याकडून सकारात्मक उत्तरे मिळत नसल्याने देवबागच्या महिला ग्रामस्थही अधिक आक्रमक बनल्या.
वीज कंपनीच्या कारभारमुळे आम्हाला प्रचंड मनस्ताप झाला असून आता आमच्या संयमाचा अंत झाला आहे. आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील मात्र आता मागे हटणार नाही. वीज समस्या सुटत नाही. वीज वितरण जोपर्यंत काम सुरू करत नाहीत तोपर्यंत वीज कार्यालयाचे टाळे खोलणार नाही, आम्हाला झालेल्या मनस्तापा बद्दल आम्ही वीज अधिकाऱ्यांविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणार असे सरपंच तांडेल यांनी सांगत ग्रामस्थांसोबत पोलीस स्थानक गाठले. वीज अधिकारी कोणतेही सहकार्य करत नसल्याने ग्रामस्थांवर ही वेळ आली असून ग्रामस्थांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी सरपंच यांनी पोलीसांकडे केली आहे.
दरम्यान, दुपारी वीज अधिकारी साखरे यांनी देवबाग गावात येत समस्या जाणून त्या तातडीने सोडवण्याबाबत सांगितले आहे, अशी माहिती ग्रामस्थ यांनी दिली. मात्र समस्या सोडविण्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही सुरु होत नाही तोपर्यंत वीज कार्यालयाचे टाळे खोलणार नाही, ही भूमिका ग्रामस्थांनी कायम ठेवली आहे.
